PFI : NIA ने कोल्हापुरातून उचललेल्या 'PFI'च्या मौला मुल्लाला 12 दिवसांची पोलिस कोठडी, गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांची करडी नजर
PFI : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी महाराष्ट्रासह जवळपास 15 राज्यांमधील 93 ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेवर छापे टाकले. यामध्ये महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश आहे.
Popular Front of India : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी महाराष्ट्रासह जवळपास 15 राज्यांमधील 93 ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेवर छापे टाकले. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने कारवाई करताना ‘पीएफआय’च्या 106 जणांना जेरबंद केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश असून त्यामधील एक कोल्हापूर शहरातील आहे. मौला मुल्ला (वय 38) असे त्याचे नाव आहे. त्याला नाशिक येथील न्यायालयाने 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
‘एनआयए’ने महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने कोल्हापूरसह औरंगाबाद, पुणे, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे छापे टाकले. यामध्ये 20 जणांना अटक करून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. एटीएसने मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे 4 गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी काही संशयितांची चौकशी सुरू आहे. दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा, दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे भरवणे, दहशतवादी कारवायांसाठी भरती करणे अशा कामांत गुंतलेल्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे ‘एनआयए’मधील सूत्रांनी म्हटले आहे.
कोल्हापुरातील मौला मुल्लावर नऊ महिन्यांपासून पोलिसांच्या रडारवर
बुधवारी मध्यरात्री कोल्हापूर शहरातील जवाहरनगर-सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या सिरत मोहल्ला येथील साहिल अपार्टमेंटमधून मौला नबीसाब मुल्लाच्या मुसक्या आवळल्या आहेत. साहिल अपार्टमेंटमधील दुसर्या मजल्यावरील मुल्लाच्या फ्लॅटवर छापा टाकत ताब्यात घेतले तेव्हा त्याची पत्नी व दोन मुले उपस्थित होती. संशयितावर राजारामपुरी पोलिसांची करडी नजर गेल्या अनेक महिन्यांपासून होती. मुल्लाकडून गेल्यावर्षी 6 डिसेंबर 2021 मध्ये विक्रमनगरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर याप्रकरणी संशयितावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जेलची हवाही खाल्ली होती. त्यामुळे राजारामपुरी पोलिसांकडून तो रडारवर होता.
छापा टाकलेल्या पथकातील अधिकार्यांनी संशयिताच्या घराची झडती घेत आक्षेपार्ह कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. अडीच तासांच्या चौकशीनंतर पथकाने संशयिताचा ताबा घेतला. संशयिताचे वडील नबीसाब मुल्ला हे मूळचे कर्नाटकातील आहेत. उदरनिर्वाहासाठी मुल्ला कुटुंब 45 वर्षांपूर्वी उचगाव येथील मणेर मळ्यात वास्तव्याला आले होते.
देशभरात एनआयएकडून छापेमारी
दरम्यान, देशभरात एनआयएच्या नेतृत्वात ईडी, दहशतवादविरोधी पथके तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्रासह गोवा, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान, पाँडिचेरी आणि दिल्लीत ‘पीएफआय’चे पदाधिकारी आणि कार्यालयांवर ही कारवाई करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या