Kolhapur News: एका आगळ्या वेगळ्या लग्नातील 'दातृत्वा'ची दुसरी कहाणी; लग्नपत्रिकेवर क्युआर कोड छापला अन् आहेराची रक्कम थेट वृद्धाश्रमाला!
समाजकार्यात अग्रेसर असलेल्या औरवाडमधील जयवंत मंगसुळे यांनी विवाहात कोणत्याही प्रकारचा आहेर न स्वीकारण्यासाठी लग्नपत्रिकेवर क्युआर कोड छापला होता. हा क्युआर कोड जानकी वृद्धाश्रमास थेट मदत करणारा होता.
Kolhapur News: गेल्या काही दिवसांपासून लग्न म्हणजे दोन नात्यांना जोडणाऱ्या घरांना खड्डा पाडणारा प्रकार होऊन गेला आहे. केवळ प्रतिष्ठेसाठी लग्नामध्ये होणारा विषय हा चिंतनाचा विषय होऊन गेला आहे. मात्र, या प्रवृत्तीला छेद देणारी घटनाही अपवाद म्हणून घडत असतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) शिरोळ (Shirol) तालुक्यातील औरवाडमध्ये या दोन्ही अपवादांना अपवाद ठरावा असा माजी उपसरपंचाचा विवाह सोहळा ठरला आहे.
समाजकार्यात अग्रेसर असलेल्या औरवाडमधील जयवंत मंगसुळे यांनी आपल्या विवाहात कोणत्याही प्रकारचा आहेर न स्वीकारण्यासाठी लग्नपत्रिकेवर क्युआर कोड छापला होता. हा क्युआर कोड जानकी वृद्धाश्रमास थेट मदत करणारा होता. त्यामुळे वाढदिवसाचे निमित्त दाखवून इंचभर देत फुटभर प्रसिद्धी करणाऱ्यांना चांगलाच आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या विधायक उपक्रमाची फक्त तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. जानकी वृद्धाश्रम जवळून पाहिल्याने आहेराच्या माध्यमातून मदत झाल्याने मदत सार्थकी लागल्याची प्रतिक्रिया जयवंत मंगसुळे यांनी दिली आहे.
आहेर क्यूआर कोडच्या माध्यमातून वृद्धाश्रमास देण्याचं आवाहन
लग्नकार्य म्हटलं की आहेर, भेटवस्तू या ठरलेल्या असतात. मात्र, औरवाडमध्ये वेगळ्या पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. लग्न पत्रिकेवर क्यूआर कोड छापण्यात आला. लग्नासाठी देणारा आहेर क्यूआर कोडच्या माध्यमातून वृद्धाश्रमास देण्याचा आवाहन करण्यात आले होते. जयवंत मंगसुळे यांना समाजकार्याची खूप आवड आहे. त्यामुळे लग्नामध्ये आहेर न स्वीकारता आहेराच्या माध्यमातून येणारी रक्कम वृद्धाश्रमास देण्याचा निर्णय घेतला. ज्यांना आहेर द्यायचा आहे त्यांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून जानकी वृद्धाश्रमास मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
लग्नात भला मोठा क्युआर कोड
जयवंत मंगसुळे यांनी यांनी लग्न मंडपात वृद्धाश्रमाच्या थेट मदतीसाठी भला मोठा क्यूआर कोड उभा केला होता. या उपक्रमातून जानकी वृद्धाश्रमास हजारो रुपयांची आर्थिक मदत मिळाली. मंगसुळे यांच्या कुटुंबाला राजकीय वलय असल्याने या विवाहसोहळ्याला पै पाहुण्यांसह आमदार आणि खासदारांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले होते. लग्नपत्रिकेवर आहेर स्वीकारला जाणार नाही असे नमूद करतानाच ज्यांना द्यायची आहे त्यांनी क्युआर कोडच्या माध्यमातून वृद्धाश्रमाला मदत करावी, असे आवाहन केले होते. त्यामुळे या हटके पद्धतीने जानकी वृद्धाश्रमाला थेट रोख रक्कम मदत म्हणून प्राप्त झाली.
इतर महत्वाच्या बातम्या