(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : फक्त दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या उच्चशिक्षित जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न; कोल्हापुरातील प्रकार
Kolhapur Crime : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह होऊन खटके उडून वाद होऊ लागल्याने कुटुंबीय सुद्धा भेदरून गेले आहे. दरम्यान, दोघांनाही उपाचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Kolhapur Crime : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी उच्चशिक्षित असलेल्या आणि प्रेमविवाह करून नव्या आयुष्याला सुरुवात केलेल्या जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील गोकुळ शिरगावमध्ये घडला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह होऊन खटके उडून वाद होऊ लागल्याने कुटुंबीयसुद्धा भेदरून गेले आहे. दरम्यान, दोघांनाही उपाचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राहुल पाटील या 24 वर्षीय तरुणाचा 22 वर्षीय वैष्णवीशी दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला. दोघांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू आहे. राहुलची पत्नी पुण्यातील आहे. दोघेही उच्चशिक्षित असून राहुल नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. अवघ्या दोन महिन्यांमध्येच त्यांच्या वादावादी सुरु झाली आहे.
दोघांनीच एकमेकांना वाचवले
घरी कोणीही नसताना घरात दोघांमध्ये शनिवारी (15 एप्रिल) किरकोळ वाद झाले. त्यामुळे याच वादातून राहुलने प्रथम फॅनला साडीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती राहुलने गळफास घेतल्याचे दिसताच पत्नी वैष्णवीने फास काढून घेत वाचवले. यानंतर वैष्णवीने सुद्धा तोच प्रकार करताना साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुलने तिचा फास सोडवला. दोघांचा हा आत्महत्येचा प्रकार शेजाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने धाव घेत सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. उच्चशिक्षित आणि एकमेकांना ओळखून प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने दोन महिन्यांमध्ये असा प्रकार केल्याने कुटुंबीय हादरून गेले आहे.
दोन जिवलग मित्रांची एकाचवेळी गळफास घेत आत्महत्या
दरम्यान, कोल्हापुरात 3 एप्रिल रोजी दोन जिवलग मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे तात्यासाहेब कोरे वारणा मिलिटरी अकादमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात एकाच झाडाच्या फांदीला विनायक पाटील व मित्र बाबासाहेब मोरे यांनी आत्महत्या केली होती. विनायक पाटील यांचा चिरा ओढण्याचा व्यवसाय होता. दोघेही गाडीवरून कोकणात जाऊन चिरा आणून त्याची विक्री करत होते. मित्र बाबासो मोरे हा विनायक यांना सहकार्य करत होता. बाबासाहेब मोरे यांचा शेतीसह जनावरांचा गोठा होता. दोघांनाही मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर असल्याने तणावात होते. आर्थिक चणचण आणि कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली होती.
माजी सरपंच पत्नीने पतीच्या वाढदिवसाला केली आत्महत्या
दरम्यान, माजी सरपंच पतीच्या वाढदिनीच माजी सरपंच पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना करवीर तालुक्यात घडली होती. सुप्रिया बाजीराव वाडकर (वय 33. रा. हणबरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. सुप्रिया यांचे वडिल दिलीप पाटील यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती बाजीराव वाडकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या