ढपला पाडता आला नाही ही मळमळ, कुणाचं तरी नाव घ्यायचं म्हणून माझं नाव घेतलं असेल; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार
मी खासदार असताना किती निधी आणला हे सांगतो, त्यांनी मंत्री असताना किती निधी आणला. कोल्हापूर शहरावर टोल लादला होता ते पाप आहे, थेट पाईपलाईनने पाणी आणलं नाही हे पाप असल्याची टीका महाडिक यांनी केली.
कोल्हापूर : : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यावर सर्वच कामांना स्थगिती दिली होती. राज्यभरातील कामांना स्थगिती देण्यात आली होती, पण माजी पालकमंत्री माझे नाव घेऊन इनडोअर स्टेडियमच्या कामाला स्थगिती दिली म्हणून टीका करत आहेत, हा माजी पालकमंत्र्यांना पोटशूळ आहे, अशी सडकून खासदार धनंजय महाडिक यांनी (Dhananjay Mahadik on Satej Patil) आमदार सतेज पाटील यांच्यावर केली. इनडोअर स्टेडियमचा निधी इतर कामांसाठी वळवण्यात आल्याने सतेज पाटील यांनी तोफ डागली होती. कोल्हापुरातील (Kolhapur News) पहिल्या इनडोअर स्टेडियमला स्थगिती आणण्याचं पाप धनंजय महाडिकांनी केल्याची टीका केली होती. इनडोअर स्टेडियममधून ढपला पाडता आला नाही ही मळमळ असल्याची टीकाही त्यांनी केली.
धनंजय महाडिक म्हणाले की, ते 15 वर्षे आमदार 8 वर्षे मंत्री होते त्यांनी काय काम केलं सांगावं. थेट पाईपलाईन अडीच वर्षात पूर्ण करतो म्हणाले होते आज 13 वर्षे झाली आहेत. ढपला पाडायची त्यांची सवय आहे. कुणाचं तरी नाव घ्यायचं म्हणून त्यांनी माझं नाव घेतलं असेल. मी खासदार असताना किती निधी आणला हे सांगतो, त्यांनी मंत्री असताना किती निधी आणला. कोल्हापूर शहरावर टोल लादला होता ते पाप आहे, थेट पाईपलाईनने पाणी आणलं नाही हे पाप आहे.
वेगळा विचार झाला तर पक्षादेश पाळू
दरम्यान, लोकसभेसाठी महाडिक कुटुंबाची तयारी विचाराल, तर आमची तयारी आहे पण याबद्दल आताच बोलणं योग्य होणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली. त्यांनी सांगितले की, भाजप हा जगभर नावलौकिक असलेला पक्ष आहे. राज्यात 48 जागांची तयारी भाजप करत आहे त्यामध्ये लपवून ठेवण्याचे कारण नाही. कोल्हापुरात दोन्ही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. फडणवीस यांनी आधीच निवडणुका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या जाणार असल्याचे सांगितले आहे. लोकसभेला हे समीकरण कसे असेल हे माहीत नाही. या दोन्ही जागा शिंदे गटाला गेल्या, तर आम्ही त्यांचा प्रचार करू. वेगळा विचार झाला तर पक्षाचा आदेश पाळू. लोकसभेसाठी महाडिक कुटुंबाची तयारी विचाराल तर आमची तयारी आहे पण याबद्दल आताच बोलणं योग्य होणार नाही. हा सर्वस्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असतो.
25 तारखेच्या सभेला माझ्या शुभेच्छा
धनंजय महाडिक शरद पवार यांच्या कोल्हापुरातील सभेवर बोलताना सांगितले की, पवार साहेब हे राज्याचे मोठे नेते आहेत. 1999 साली कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. 25 तारखेच्या सभेला माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यात नव्याने समीकरण घातलं आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. पक्ष वाढवण्यासाठी पवार साहेब राज्यभर दौरा करत आहेत, त्यांना शुभेच्छा देतो.
इतर महत्वाच्या बातम्या