Kolhapur News: अवघ्या 20 दिवसांच्या तान्हुलीला दूध पाजताना काळाने घात केला; आईचा आकस्मिक मृत्यू, कोल्हापुरातील मन हेलावून टाकणारी घटना
Kolhapur News: 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना कोल्हापुरात महिलेचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे.

कोल्हापूर: कोल्हापुरात वीस दिवसांच्या बाळाला दूध पाजत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Kolhapur News) घडली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या महिलेच्या मृत्यूचं कारण समजणार आहे. संभाजीनगरमधील जुनी मोरे कॉलनी या ठिकाणी ही घटना घडली. बुधवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रचना चौगले असं या महिलेचं नाव आहे. आठवडाभरापूर्वीच मोठ्या थाटामाटात बारशाचा कार्यक्रम पार पाडला होता. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे नामकरण पियुषा असं ठेवण्यात आलेलं. या हृदयस्पर्शी घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. (Kolhapur News)
आशा वर्कर म्हणून कार्यरत होत्या
मिळालेल्या माहितीनुसार, वीस दिवसांच्या मुलीला दूध पाजत असतानाच आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला, ही घटना कोल्हापुरात काल (गुरुवारी, ता, 25) घडली. रचना स्वप्निल चौगले (27, रा. संभाजीनगर स्टँडजवळ, कोल्हापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्या आशा वर्कर म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा आणि स्वप्निल यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना सहा वर्षांची मोठी एक मुलगी आहे. तर 20 दिवसांपूर्वी त्यांना दुसरी मुलगी झाली होती. कुटुंबीयांनी छोट्या मुलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केला मोठा थाटमाट झाला. आठवड्यापूर्वीच तिचं बारसं देखील घालण्यात आलं होतं. तिचं पीयूषा असं नाव ठेवलं. माय लेकी दोघींची तब्येत अगदी व्यवस्थित होती. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास रचना मुलीला दूध पाजत असतानाच काही वेळाने मुलगी रडू लागली. त्यानंतर पती स्वप्निल यांनी उठून पत्नीला हलवण्याचा प्रयत्न केला, तर त्या बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. तातडीने त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने पत्नीला सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथून सीपीआरमध्ये हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Kolhapur News)
तोपर्यंत खूप उशीर झाला होता
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने नातेवाइकांच्या मदतीने पत्नीला सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती गंभीर असल्याने तिला सीपीआरमध्ये हलवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. बाळाला दूध पाजत असताना काळाने घाला घातला आणि चिमुकली आपल्या आईपासून दुरावली.























