(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur, Hatkanangle Lok Sabha : राजू शेट्टी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचाही उद्याचा मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Kolhapur, Hatkanangle Lok Sabha : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.
Kolhapur, Hatkanangle Lok Sabha : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी उद्या (15 एप्रिल) हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून ते बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे. ही लढाई एकट्याची नसून आपल्या सर्वांची आहे हे दाखवण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दसरा चौकात सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे. राजू शेट्टी चौथ्यांदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये रिंगणात असून त्यांच्यासमोर तब्बल चार उमेदवारांचे आव्हान आहे.
या मतदारसंघामध्ये काय होणार याचे उत्तर 4 जून रोजीच मिळणार आहे. शेट्टी यांच्यासह या मतदारसंघामध्ये महायुतीचे धैर्यशील माने, वंचितचे डीसी पाटील, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये आता पंचरंगी लढत झाली आहे.
संजय मंडलिक आणि धैर्यशील माने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल
दुसरीकडे कोल्हापुरातील शिंदे गटाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे सुद्धा उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार अर्ज दाखल करतील. दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शक्तीप्रदर्शन सुद्धा या निमित्ताने केलं जाणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी हातकणंग लोकसभा मतदारसंघांमध्ये जोडण्या लावताना पहाटेपर्यंत भेटीगाठी घेतल्या होत्या. शिंदे यांनी रविवारी मध्यरात्री आमदार विनय कोरे आणि समर्थक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सुद्धा भेट घेत मनधरणी केली. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विनय कोरे हे सध्या महायुतीमध्ये असले तरी त्यांनी अजूनही माने यांचा प्रचार म्हणावा तसा सुरू केलेला नाही. शिंदे यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेत प्रचारामध्ये सक्रिय होण्याचे आवाहन केले.
महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन
शिंदे यांच्या उपस्थितीत संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी हातकणंगलेत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी केंद्रात सक्षम सरकार हवे असेल तर महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक असून देशाला दिशा देणारी आणि प्रगतीपथावर नेणारी अशी ही निवडणूक असल्याचे म्हणाले. ते म्हणाले की, महापुरात मी इथे मदतीसाठी आलो होतो तेव्हा कोल्हापूरकर नागरिकांची माणुसकी अनुभवली होती. कोल्हापुरातील नागरिकांची वारंवार येणाऱ्या महापुरातून मुक्तता करण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 3 हजार 200 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच पंचगंगेचे प्रदुषण दूर करण्यासाठी 350 कोटी रुपये निधी दिल्याचे सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या