Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या वाढदिवशी समर्थकांकडून कागल, अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात महाआरती, ग्रामदैवतांना अभिषेक
हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस आणि रामनवमीचे औचित्य साधत आज मुश्रीफ समर्थकांकडून कागलमधील राम मंदिर, करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर आणि जोतिबा डोंगरावर महाआरती करण्यात आली.
![Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या वाढदिवशी समर्थकांकडून कागल, अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात महाआरती, ग्रामदैवतांना अभिषेक Kolhapur hasan mushrif birthday Maha Aarti at Kagal Ambabai and Jyotiba temple Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या वाढदिवशी समर्थकांकडून कागल, अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात महाआरती, ग्रामदैवतांना अभिषेक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/30/fae5770a485296f639a279974868ee6f1680159797873444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची मातब्बर नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस आणि रामनवमीचे औचित्य साधत आज मुश्रीफ समर्थकांकडून कागलमधील राम मंदिर, करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर आणि जोतिबा डोंगरावर महाआरती करण्यात आली.
कागल मतदारसंघात जंगी कार्यक्रमाचे आयोजन
मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघामध्ये विविध जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वाढदिवस दणक्यात करण्यासाठी समर्थकांनी चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ ईडीकडून झालेल्या छापेमारीमुळे अडचणीत आहेत. त्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला आहे, आतापर्यंत तीनवेळा त्यांच्यावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज वाढदिवस समर्थकांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन केले आहे.
कागल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील ग्रामदैवतला अभिषेक,महाआरतीचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाप्रसादाचे वाटप केलं जाणार आहे. मंदिरामध्ये जलाभिषेक, दुग्धाभिषेक घालून महाआरती करण्यात येणार आहे. कागल शहरातील लक्ष्मी मंदिर परिसर स्वच्छता, राम मंदिरात अभिषेक व महाआरती केली जाणार आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिर, साखर व कापडी पिशव्या वाटप, भारतीय संविधान ग्रंथ वाटप, रांगोळी स्पर्धा, स्नेहभोजन, केक वाटप व शालेय साहित्य वाटप केलं जाणार आहे.
कागल शहर मर्यादित रामनवमीला जन्माला आलेल्या मुलीच्या नावे 5000 रुपयांची ठेव, शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, वह्या वाटप, कॅन्सरग्रस्त लहान मुलांना साहित्याचे वाटप, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आला आहे. दरम्यान, कागल शहरामध्ये बॅनर्स लावण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी कमान उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करून समर्थक पाठीशी असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.
हसन मुश्रीफांना 5 एप्रिलपर्यंत दिलासा
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील निर्णय विशेष न्यायालयाने राखून ठेवला आहे. 5 एप्रिल रोजी याचिकेवर निकाल लागण्याची शक्यता आहे. मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी संरक्षण दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. तसेच तातडीने सुनावणी घेण्यासही सूचना केली होती. विशेष न्यायालयाने ईडी आणि मुश्रीफ यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)