Kolhapur News : कोल्हापुरात लागले 'मोदी हटाव, देश बचाओ'चे बॅनर; चौकाचौकातील बॅनर्सने रंगली एकच चर्चा!
Kolhapur News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांनी या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हे बॅनर चर्चेचा विषय झाले.
Kolhapur News : कोल्हापूर शहरात आज (30 मार्च) सकाळी 'मोदी हटाव, देश बचाव' या आशयाचे बॅनर्स लागल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर शहरातील जनता बाजार चौक, माऊली चौक, पार्वती टॉकीज यासारख्या महत्त्वाच्या चौकात 'मोदी हटाओ देश बचाओ' बॅनर लावण्यात आले आहेत. देवकर पाणंद परिसरात लावलेला याच आशयाचा फलक मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या एका नागरिकाने फाडून टाकला.
कोल्हापूर शहरातील मुख्य चौकांमध्ये मध्यरात्री अज्ञातांनी 'मोदी हटाव, देश बचाओ' बॅनर लावले आहेत. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार निदर्शनाला आला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फिरण्यास गेलेल्या काही नागरिकांनी या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने चर्चेचा विषय झाले आहेत. तथापि, बॅनर कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी दिल्लीत 'आप'ने लावलेल्या बॅनर सारखे दिसणारे हे बॅनर असल्याचे समजते.
देशभरात विरोधी पक्ष एकवटले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेनंतर रद्द करण्यात आलेली खासदारकी, अदानी प्रकरणावरून मोदी सरकारची मौनाची भूमिका आदी मुद्यांवरून देशभरात विरोधी पक्षांकडून रणकंदन सुरु आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. काँग्रेसकडून राजधानी दिल्लीसह देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हे बॅनर झळकले आहेत का? अशीही चर्चा आहे.
राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर लोकसभेच्या सभागृह समितीने ही नोटीस जारी केली आहे. राहुल गांधी 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. नोटीसनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. गुजरातमधील सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनावा'शी संबंधित केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यातच शुक्रवारी राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या