Sadabhau Khot on Raju Shetti: सदाभाऊ खोत म्हणतात, या कारणांसाठी मी राजू शेट्टींवर बोलतो!, अन्यथा हा गडी...
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्री असताना आणि नसताना काय फरक पडतो, याची अप्रत्यक्षरित्या खंत बोलून दाखवली आहे. कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी चांगलीच फटकेबाजी केली.
Sadabhau Khot on Raju Shetti : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अप्रत्यक्षरित्या मंत्री असताना आणि नसताना काय फरक पडतो, याची खंत बोलून दाखवली आहे. कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर आपण का बोलतो, यावरही जाहीरपणे भाष्य केलं.
म्हणून मी राजू शेट्टी यांच्यावर बोलतो
कधीकाळी सहकारी राहिलेल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढलेल्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात आता विस्तवही जात नाही. सदाभाऊ खोत यांनी यावेळी राजू शेट्टी यांच्यावर का बोलतो? यावर जाहीरपणे भाष्य केले. सदाभाऊ म्हणाले की, "बातमी कशीही येवू दे, वाईट बातमी उद्या चांगली होते, पण आपली बातमी आलीच पाहिजे. कारण बातमी आली तरच समाजाला कळेल हा गडी अजून जिवंत आहे. माणूस चर्चेतून संपला की त्याचं मूल्य संपतं. त्यामुळे माणूस हा नेहमी चर्चेत असला पाहिजे. मला अनेक जण विचारतात तुम्ही राजू शेट्टींवर का बोलता? पण राजू शेट्टींवर बोललो नाही, तर चर्चाच होत नाही. मी बोललो तर राजू शेट्टी बोलतात, त्यामुळे दोघेही चर्चेत राहतो."
मंत्रिपद गेलं आणि पाखरंही उडून गेली
सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपद असताना आणि नसताना काय अवस्था असते, याचाही फरक उलघडून सांगितला. ते म्हणतात, "मी मंत्री झालो त्यावेळी घरासमोर लोकांची इतकी गर्दी असायची की दोन किलोमीटर गाड्यांच्या रांगा लागत होत्या. पीए वाढवले, अधिकारी आले, लोकं कौतुक करू लागली. लोकं म्हणायची भाऊ तुमच्यासारखा मंत्री नाही. कौतुक करायचे, पण कौतुक माणसाला फसवत असतं. मंत्रिपद गेलं आणि भरलेल्या कणसातील दाणं संपल्यावर पाखरं उडून जातात तसं झालं. पाखरं गेली उडून मी एकटाच राहिलो, कौतुक करणारा देखील राहिला नाही. कौतुक हे तुमच्यासाठी आहे की पदासाठी हे ओळखायला पाहिजे."
पहाटे चारपर्यंत अभ्यास करायचो
सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपद असताना कशी कार्यशैली होती यावरही भाष्य केले. ते म्हणाले, "मंत्री असताना किती चौकशी समित्या नेमल्या मलाच माहिती नाहीत. मी मंत्री असताना पहाटे चारपर्यंत अभ्यास करायचो. सभागृहात तयारीने जायचो, पण प्रश्न उत्तर सुरू झालं की कागदच सापडत नव्हते. त्यामुळे मी एकनाथ खडसेंचा एकदा सल्ला घेतला. त्यावेळी त्यांनी सभागृहात बसून राहा आणि एखादा गहन प्रश्न आला की म्हणायचं सन्माननीय सदस्य निश्चित याला न्याय मिळाला पाहिजे, चौकशी करू, समिती नेमून दोषींवर कारवाई करू. पुढील प्रश्न विचारला, तर चौकशी समिती नेमली जाईल असं म्हणायचं, पण आजपर्यंत किती चौकशी नेमल्या आणि कुणाला नेमल्या याच मलाच पत्ता नसायचा. त्यानंतर मी सभागृहात अभ्यास करायचा बंद केला. मधल्या वाटेने पळून जाता येतं हे मला कळालं, पण एकनाथ शिंदे यांच्यासारखे नाही.
इतर महत्वाच्या बातम्या