Kolhapur Flood Update : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा वेढा, जिल्ह्यातील कोणते मार्ग सुरु आणि कोणते बंद?
गेल्या 24 तासांपासून पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महापुराची धास्ती लागली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने परिस्थिती काहीशी चिंताजनक झाली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पावसाने उघडी दिली असली, तरी धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. पंचगंगा नदी पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असून पंचगंगा आता 45 फुटांवरून वाहत आहे. नदीची धोका पातळी 43 फूट आहे. मात्र गेल्या 24 तासांपासून पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महापुराची धास्ती लागली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने परिस्थिती काहीशी चिंताजनक झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची वाहतूक यंत्रणा कोलमडली
जिल्ह्यातील 95 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पडझडीमुळे सुद्धा अनेक ठिकाणी वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. कोल्हापुरातून कोकणाकडे जाणारी वाहतूक खंडीत झाली आहे. कोल्हापुरातून गगनबावड्याकडे जाणाऱ्या बालिंग पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आल्याने कोकणसह गोव्याकडील वाहतूक थांबली आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग सुद्धा पुराच्या पाण्याने बंद झाला आहे. कोल्हापूर-गारगोटी मार्ग सुद्धा मडिलगेत पाणी आल्याने बंद झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे.
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर पाणी येण्याची भीती वर्तवली जात होती. ती पुन्हा एकदा खरी ठरण्याची शक्यता आहे. आज कर्नाटक हद्दीत निपाणीजवळ वेदगंगा नदीचे पाणी महामार्गावर आल्याने सेवा मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कदाचित पाण्याची पातळी वाढल्यास महामार्गावरून वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोल्हापूर शहरात पाणी पसरण्यास सुरवात
कोल्हापूर शहरात पंचगंगा नदी आणि जयंती नाल्याचे पाणी पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील सखल भाग असलेल्या भागांमध्ये पाणी पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागाळा पार्क, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरीतील कुंभार गल्ली भागांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. कुंभारवाडा परिसरात पाणी भरण्याससुरुवात झाली आहे. बापट कॅम्प परिसरात 21 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. शहरातील सुतारवाड्यात पाणी वाढल्याने येथील कुटुंबीयांनी चित्रदुर्ग मठात स्थलांतर केलं आहे. कसबा बावड्यात पाणी येण्याची शक्यता गृहीत धरून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.
जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद?
- कोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली
- कोल्हापूर रत्नागिरी मार्ग बंद
- बालिंगा पुलावरून वाहतूक बंद केल्याने गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद
- भुदरगड तालुक्यातील मडिलगेजवळ रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर गारगोटी मार्ग बंद
- जिल्ह्यातील 11 राज्य मार्ग आणि 29 जिल्हा मार्ग बंद
- जिल्हा परिषदेतील 38 रस्ते बंद
- पर्याय मार्गावरून वाहतूक सुरू
- कोल्हापुर रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडीजवळ रेडेडोह महामार्गावरच जेसीबीच्या साह्याने अज्ञाताने फोडला
- कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने एसटीच्या 750 फेऱ्या रद्द करण्यात आला आहेत
- गडहिंग्लज तालुक्यामध्ये होत असलेल्या पावसाने 65 गावांशी संपर्क तुटला आहे
जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली?
पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी
भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव
तुळशी नदी- बीड, आरे, बाचणी व घुंगुरवाडी
कासारी नदी- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी
कुंभी नदी- शेणवडे, कळे, वेतवडे, मांडुकली व असळज
धामणी नदी- सुळे, आंबर्डे, गवशी, गाटीवडे, पानोरे, म्हसुर्ली व शेळोशी
वारणा नदी-चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी
कडवी नदी- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे
शाळी नदी- येळाणे
दुधगंगा नदी- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी, दत्तवाड व तुरुंबे
वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली
हिरण्यकेशी नदी- साळगांव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, जरळी, हजगोळी, भादवण, गजरगाव व गिजवणे
घटप्रभा नदी- कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर
ताम्रपर्णी नदी- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी. चित्री नदी - परोली असे एकूण 95 बंधारे पाण्याखाली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या