Kolhapur Crime: कोल्हापुरातील कात्यायनी ज्वेलर्समधील सशस्त्र दरोड्यातील दरोडेखोर मध्य प्रदेशातून जेरबंद; सोळा लाखांवर मुद्देमाल जप्त
दरोडेखोर मध्य प्रदेशातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले होते. गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य ओळखून तपास करवीर पोलिसांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
कोल्हापूर : जून महिन्यात कोल्हापुरात थरकाप उडवणाऱ्या कात्यायनी ज्येलर्सवरील सशस्त्र दरोड्यात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या दरोडेखोराच्या कोल्हापूर पोलिसांच्या एलसीबीने जेरबंद केले आहे. गुन्ह्याचा तपास करताना दरोडेखोर मध्य प्रदेशातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले होते. गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य ओळखून तपास करवीर पोलिसांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. इंदुरमध्ये सापळा रचून आरोपी अंकित शर्माच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
दरोडा दिवसाढवळ्या दरोडा टाकून अंदाधुंद गोळीबार करुन दहशत माजवणारा आरोपी अंकित शर्मा मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये गुन्ह्यातील चोरीचे दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर नियुक्त केलेल्या पथकाने इंदुरमध्ये सापळा रचून अंकित उर्फ छोटु श्रीनिवास शर्मा याला (वय 23, रा.पुठ रौड, एमएलडी कॉलनी, अम्बाह, जि.मुरैना, मध्य प्रदेश) ताब्यात घेतले. त्याच्याकडून ह्युंडाई वेरणा कार, 4 अॅड्राईड मोबाईल, 1 वायफाय डोंगल, 1 की पॅड मोबाईल, 2 व्होडाफोन सिमकार्ड असा एकुण 6 लाख 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपीला 1 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आल्यानंतर आजपर्यंत (11 सप्टेंबर) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पथकाने आरोपीसह मध्य प्रदेशात पुन्हा जात इंदुरमधील त्याच्या भाड्याच्या घरातील गुन्ह्यात वापरलेल्या दोन पिस्टल, 7 जिवंत काडतुसे, गुन्ह्यावेळी वापरलेले कपडे मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींच्या मुसक्या आवळताना चोरीतील 517.72 ग्रॅम सोन्याचे दागिने व लगड जप्त केली आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील दरोड्यामध्ये वापरलेली हत्यारे दोन पिस्टलसह 7 जिवंत काडतुसे, 3 मोटरसायकल, 2 चारचाकी वाहने, मोबाईल, सिमकार्ड, डोंगल असा एकुण 44 लाख 54 हजार 695 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एकुण 16 लाख 22 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
गुन्ह्यात चोरी केलेल्या दागिन्यातील आरोपी अंकीतने वाटणीला आलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने स्थानिक सोनारास विकले होते. आरोपीने माहिती दिल्यानंतर 9 लाख 4 हजार 140 रुपये किंमतीची दीडशे ग्रॅम वजनाची सोन्याची लगडही जप्त करण्यात आली. त्याच्याकडून आतापर्यंत 150 ग्रॅम सोने, 2 पिस्टल, 7 जिवंत काडतुसे, ह्युंडाई कार, पाच मोबाईल हॅण्डसेट, डोगल, सिमकार्डस असा एकुण 16 लाख 22 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
तीन स्थानिक आरोपींना यापूर्वीच अटक
दरम्यान, या गुन्ह्यातील तीन स्थानिक आरोपींकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 367 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट कार व एक मोटरसायकल जप्त केला होता. पोलिसांनी सतीश उर्फ संदीप सखाराम पोहाळकर (वय 37, रा. प्लॉट न.बी 12 न्यु कणेकरनगर रिंगरोड, कोल्हापूर, मुळ गाव दोनवडे ता. करवीर, विशाल धनाजी वरेकर (वय 32 रा. प्लॉट न.8/9 मंजुळा निवास आदर्श इंग्लिश स्कुल व ज्युनि. कॉलेज, कोपार्डे ता. करवीर आणि अंबाजी शिवाजी सुळेकर (वय 44, रा. पासार्डे ता. करवीर, जि. कोल्हापूर) या तीन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याविरुद्ध 6 सप्टेंबर रोजी दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिस निरीक्षक, महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे तसेच पोलिस अंमलदार रामचंद्र कोळी, संजय हुंबे, संजय कुंभार, विलास किरोळकर, सागर चौगले, सुरेश पाटील, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने केली.
इतर महत्वाच्या बातम्या