Kolhapur Crime : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन CPR मधून पळालेला कैदी साडेसात तासांनी सापडला; यापूर्वी मिरजेतूनही पळाला होता
Kolhapur Crime : सीपीआरमध्ये उपचारासाठी आणल्यानंतर पोलिस आणि डाॅक्टरांच्या हाती तुरी देऊन पसार झालेल्या कैद्याला तब्बल साडे सात तासांच्या शोधमोहिमेनंतर अटक करण्यात आली.

Kolhapur Crime : सीपीआरमध्ये उपचारासाठी आणल्यानंतर पोलीस आणि डाॅक्टरांच्या हाती तुरी देऊन पसार झालेल्या कैद्याला तब्बल साडेसात तासांच्या शोधमोहिमेनंतर अटक करण्यात आली. पळून गेल्यानंतर तो ऊसात लपला होता. मात्र, संध्याकाळ झाल्यानंतर ऊसातून बाहेर पडून जात असताना पोलिसांनी त्याला ओळखून पकडले. यापूर्वी तो मिरजेतील रुग्णालयातूनही पळून गेला होता. तेव्हा तो 20 दिवस उसाच्या शेतात बसून होता.
निवास अरविंद होनमाने (वय 35, रा. येळावी, तासगाव, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. याची फिर्यादी सहाय्यक फौजदार संजय महादेव घोंगडे यांनी याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. फरार झालेल्या कैदी निवासला शनिवारी (4 मार्च) रात्री आठच्या सुमारास रमण मळ्यातील पोस्ट ऑफिस चौकात पकडण्यात आले. पोलिसांनी शेतासह सर्वत्र शोध सुरू केला होता. सीसीटीव्हीचीसुद्धा पाहणी करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैद्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आलं होतं. यावेळी एका कैद्यासोबत दोन, तर दोन कैद्यासोबत तिघे पोलिस असतात. यामध्ये एक बंदूकधारी पोलीस असतो. या बंदोबस्तामध्ये उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले होते. कैदी निवासला क्षयरोगाचा त्रास असल्याने त्याला आणण्यात आले होते. त्याच्या हातातही बेड्या होत्या. उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कैद्याच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ती आणण्यासाठी गेल्यानंतर धक्का देवून तो पळून गेला. महिला कर्मचाऱ्याला लक्षात येताच त्यांनी कैदी पळाला म्हणत ओरडा केला. पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करण्यात आला, पण त्यांना कैदी नेमका कोठे गेला हे समजून आले नाही.
पोलिसांनी परिसर पिंजून काढला
कैदी फरार झाल्यानंतर पोलिसांनी सीपीआरचा परिसर पिंजून काढला. सर्व शक्यता गृहीत धरून, पोलिसांनी यंत्रणा सतर्क ठेवली होती. सीसीटीव्हीचा आधार घेतला गेला. तो पळून गेल्यानंतर त्याच्या हातात बेडी तशीच होती. सीपीआरच्या भिंतीवरून उडी मारल्यानंतर हातातील बेडी लपवत तो दसरा चौकातून शहाजी कॉलेजच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर विन्स हॉस्पटलकडे जाणाऱ्या नागाळा पार्क रस्त्याकडून तो शेतवडीत पोहोचला. दिवसभर उसाच्या शेतात लपून बसला. अंधार पडल्यानंतर तो रमण मळ्यातून पोस्ट ऑफिस चौकाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला फिट आल्यामुळे सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
