Birdev Done : UPSC चा निकाल लागला, IPS झालेला कोल्हापूरचा बिरदेव मात्र मेंढ्या घेऊन कर्नाटकला गेला, पालावरच धनगरी फेटा बांधून सत्कार
Birdev Done UPSC : कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससीमध्ये मोठं यश मिळवलं आहे. मेंढ्या घेऊन गेला असताना त्याचा पालावरच सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर : देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे यूपीएससी. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस, आयपीएस अधिकारी बनायचं आणि देशाची सेवा करायची अशी अनेक तरुणांची इच्छा. काहींना त्यामध्ये यश येतं तर काहींना अपयश. सर्व सुविधा असताना, कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणे हे तुलनेने अधिक सोपं. पण संपूर्ण परिस्थितीच बिकट, अभ्यासासाठी जागाही नाही किंवा आर्थिक पाठबळ नसताना या परीक्षेत यश (UPSC Result) मिळवणे म्हणजे अधिक कौतुकास्पद. हेच यश कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने मिळवलंय. बिरदेव सिद्धापा डोणे (Birdev Done ) असं त्याचं नाव आहे. यूपीएससीमध्ये त्याने देशात 551 वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता.
बिरदेव डोणेचे (Birdev Done IPS) मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे. शाळेत असल्यापासूनच आयपीएस व्हायची इच्छा, त्यासाठी परिस्थितीला तोंड देत त्याने अभ्यास केला. दोन वेळा अपयश आल्यानंतरही खचला नाही. तिसऱ्या प्रयत्नात मात्र देशात 551 व्या क्रमांकाने यश मिळवलं. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे यश मिळवलं आहे. बिरदेव डोणेला भारतीय पोलिस सेवा म्हणजे आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा बिरदेव डोणेचा परिवार आहे.
Birdev Done Profile : दहावी-बारावीमध्ये पहिला क्रमांक
बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगे गावातील विद्यामंदीर शाळेत झाले. त्याच ठिकाणच्या जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीमध्ये 96 टक्के गुण घेऊन बिरदेव हा मुरगूड केंद्रात पहिला आला. त्यानंतर मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये त्याने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. बारावीमध्येही 89 टक्के गुण मिळवून त्याने पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर पुण्यातील सीओईपीमधून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली.
IPS व्हायचं स्वप्न उराशी
सुरुवातीपासूनच यूपीएससी करून अधिकारी व्हायचं स्वप्न बिरदेवने उराशी बाळगलं. पण त्यासाठी परिस्थितीची अडचण होती. दिल्ली-पुण्यात जाऊन यूपीएससीचा अभ्यास करणे म्हणजे खर्चाचे. त्यासाठी महिनाकाठी किमान दहा ते बारा हजार रुपयांचा खर्च. तो खर्च परवडणार नाही, त्यामुळे तू कुठेतरी नोकरी बघ असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी दिला. परंतु आयपीएस व्हायचंच या एका इच्छेने बिरदेवने परिस्थितीवर मात केली.
बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा भारतीय सैन्यात सेवेत आहे. त्याने बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला. बिरदेवने दोन वर्षे दिल्लीत अभ्यास केला. त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली. पहिल्या दोन संधीमध्ये तो अपयशी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात तो देशात 551 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
निकाल लागला त्यावेळी मेंढ्या घेऊन कर्नाटकात
यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये बिरदेव हा 551 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची बातमी आली. त्यावेळी त्याच्या यमगे या गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला. पण बिरदेव मात्र गावात नव्हता. बिरदेव त्याच्या आई-वडिलांसह बेळगावमधील अथणी येथे मेंढ्यासंह गेला होता. निकालाची माहिती मिळताच पालावरच धनगरी फेटा बांधून बिरदेवचा सत्कार करण्यात आला.
जिद्द आणि मेहनत असेल तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच कोल्हापूरच्या बिरदेव डोणेने त्याच्या कृतीतून सिद्ध केलं.























