UPSC क्रॅक... आदिबा अहमद बनली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS; देशात 142 वी रँक, आई-वडिलांनी भरवला पेढा
आदिबाने पदवीचे शिक्षण आबेदा इनामदार महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले. आदिबाने बीए उर्दु आणि बीए गणित विषयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

यवतमाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC 2024 परीक्षेचा (upsc) अंतिम निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये, शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकवण्याचा बहुमान मिळवला असून महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे देशात तिसरा आला आहे. यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील तरुणाईने यश संपादित करत मराठी पताका फडकवली. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातली अदिबा अनम अश्फाक अहमदने भारतात 142 वी रँक प्राप्त करत दैदिप्यमान यश मिळवले आहे. आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनली आहे. तिच्या या यशानंतर आई-वडिलांनी पेढा भरवत तिचे कौतुक व अभिनंदन केले.
आदिबाने पदवीचे शिक्षण आबेदा इनामदार महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले. आदिबाने बीए उर्दु आणि बीए गणित विषयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर, तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली होती. आदिबा ही हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था आणि नंतर जामीया निवासी प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होती. तिच्या या यशाबद्दल तिच्या मित्र, नातेवाईक व कुटुंबीयांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, आदिबाने यापूर्वी यूपीएससीची मुलाखत दिली होती, परंतु अंतिम निवड यादीत तिचे नाव आले नाही. मात्र, तिने हार न मानता पुन्हा युपीएससी परीक्षेची तयारी केली. यंदाच्या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाल्याने कुटुंबीयांनी अत्यानंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे
मुलंडची अंकिता पाटील देशात 303 वी
युपीएससी परीक्षेत मुंबईतील मुलुंड येथील राहणारी अंकिता पाटील हिने देखील यश मिळवले असून भारतातून 303 वा क्रमांक पटकवला आहे. त्यामुळे तिचे कौतुक होत असून पाटील यांच्या घरामध्ये अंकिताच्या यशाचा मोठा आनंद साजरा केला जात आहे. खूप आनंद झाला आहे, मागील तीन चार वर्षे हार्ड वर्क केले. त्या एवढ्या वर्षाची मेहनत फळाला आली. दररोज आठ ते दहा तास अभ्यास केला. कुटुबियांना थोडा कमी वेळ देत होती. घरच्यांचाही मला पाठींबा होता. आई वडिलांची हीच इच्छा होती की हे लक्ष्य मी गाठावे. ते लक्ष्य मी गाठलेच, असे अंकिताने या यशानंतर बोलताना म्हटले. तर, इतर विद्यार्थ्याना हाच संदेश आहे की, केवळ कठोर मेहनत हे आपल्या हातात आहे. याच्या जोडीनं स्मार्ट वर्क करा. नकारार्थी निकाल आला तरी खचून न जाता त्यातच गुंतून न बसता पुन्हा जिद्दीने अभ्यासाची तयारी करा, असे अंकिताने नव्या परीक्षार्थींसाठी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन
केंद्रीय लोकसेवा आयोग 2024 परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र अर्चित डोंगरे राज्यातून प्रथम क्रमांकाने व राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला, याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी अर्चितचे मनापासून अभिनंदन. या परीक्षेमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शक्ती दुबे व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या हर्षिता गोयल यांच्यासह उत्तीर्ण झालेल्या सर्व परीक्षार्थ्यांचेही अतिशय मनापासून अभिनंदन व सर्वांना अधिकारी म्हणून रुजू होऊन राष्ट्रसेवा करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा, असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
हेही वाचा
काश्मीरमध्ये दहशवादी हल्ल्यात 27 पर्यटक ठार झाल्याची शक्यता; अमित शाह तातडीने श्रीनगरला रवाना























