(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : आमदारांना फसवण्याच्या नादात अटकेत गेला, पण जामीन मिळताच गावच्या गल्लीत भलतीच स्टंटबाजी
आमदारांची फसवणूक करण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील रियाज हा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील आहे. तोच या कटाचा मुख्य सुत्रधार होता. आता त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर गावी परतला.
Kolhapur Crime : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले असले, तरी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचे नाव येणार, कोणाला मंत्रीपद मिळणार? याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. अनेकांकडून शक्तीप्रदर्शन सुरु आहे. नेमक्या याच राजकीय स्थितीचा लाभ घेत थेट आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे. एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या आरोपींची नावे रियाज अल्लाबक्ष शेख, योगेश मधुकर कुलकर्णी, सागर विकास संगवई, आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कोल्हापूरचा रियाज या कटाचा मुख्य सुत्रधार
अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील रियाज हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथील आहे. तोच या कटाचा मुख्य सुत्रधार होता. आता त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर गावी परतला. गावात आल्यानंतर एखाद्या कुस्तीचे मैदान मारुन आल्याप्रमाणे त्याने स्टंटबाजी केली. गल्लीत आल्यानंतर झालेल्या स्वागताचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावेळी रियाज शेखला जामीन मिळाल्याने फटाके उडवून फुले सुद्धा उधळण्यात आली.
रियाजचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले असून त्याला झटपट श्रीमंतीचा नाद लागला होता. सुरुवातीला व्हिडिओ सेंटरमध्ये काम केल्यानंतर केबल व्यवसायात उतरला. तेथून त्याने मोर्चा मायनिंगकडे वळवत बक्कळ पैसा कमवून अलीशान जीवन जगू लागला. या दरम्यान त्याचे राजकीय नेत्यांशी संबंध येऊ लागले. रियाजने मोठा डाव एका दमात साध्य करण्याच्या इराद्याने थेट आमदारांना गंडवण्याचा बेत रचला, पण त्याचा डाव अंगलट आल्याने जेलची हवा खावी लागली.
इतर महत्त्वाच्या बातम्या