(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Dairy Festival In Kolhapur : कोल्हापुरात जानेवारीत इंडियन डेअरी फेस्टिव्हल; खासगी व सहकारी दूध डेअरीचे प्रतिनिधी सहभागी होणार
Indian Dairy Festival In Kolhapur : काही वर्षांपूर्वी मेगा मिल्क डेअरी इव्हेंट सुरू झाल्यानंतर प्रथमच ‘इंडियन डेअरी फेस्टिव्हल-2023’ आयोजित करण्यासाठी कोल्हापूर शहराची निवड करण्यात आली आहे.
Indian Dairy Festival In Kolhapur : काही वर्षांपूर्वी मेगा मिल्क डेअरी इव्हेंट सुरू झाल्यानंतर प्रथमच ‘इंडियन डेअरी फेस्टिव्हल-2023’ आयोजित करण्यासाठी कोल्हापूर शहराची निवड करण्यात आली आहे. हा महोत्सव 20 जानेवारीपासून तीन दिवस चालणार आहे. यात खासगी व सहकारी दूध डेअरीचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि विविध डेअरी उत्पादने, यंत्रसामग्री आणि व्यवसाय योजनांचे प्रदर्शन पाहायला मिळेल.
इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून कोल्हापुरात 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत इंडियन डेअरी फेस्टिव्हलचे (Indian Dairy Festival In Kolhapur) आयोजन करण्यात आले आहे. फेस्टिव्हलमधील दूध परिषद सयाजी हॉटेलमध्ये, तर शाहूपुरीतील जिमखाना मैदानात डेअरी एक्स्पो होईल. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील सहकारी आणि खासगी दूध संघ, देशातील डेअरी उद्योगातील सर्व सहयोगी घटक सहभागी होतील, अशी माहिती ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी दिली आहे.
दूध परिषदेत देशातील दुग्ध व्यवसायासमोरील संधी, आव्हाने, दूध उत्पादनात वाढ आणि 2030 पर्यंतची ध्येयधोरणे ठरविण्यासाठी तज्ज्ञ सहभागी होतील. शाहूपुरी जिमखाना मैदानात दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून, दूध संस्था, दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळेल. ‘नांदी नव्या धवल क्रांतीची’ हे घोषवाक्य घेऊन आणि सद्य:स्थितीतील पशुधन, डेअरी क्षेत्रातील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळावर अधिक आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, संकलन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासह विविध विषयांवर यामध्ये चर्चा होईल. दूध उत्पादक, सर्व दूध संस्था आणि डेअरी उद्योगातील सर्व घटक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतील.
दुसरीकडे लम्पी चर्मरोगाने दुग्ध व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना यावर भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, दूग्ध व्यवसायात फ्लश आणि लीन सीझन असे दोन सिझन आहेत. यामध्ये फ्लश सिझनमध्ये दूधाची पावडर करून विकतो, पण या दोन कालावधींमध्ये फ्लश सिझन आलाच नाही.
पाऊस अनियमित झाल्याने चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्याचबरोबर लम्पी चर्मरोगाने अनेक जनावरे दगावली आहेत. जनावरांना करण्यात आलेल्या लसीकरणामुळे त्यांच्यातील सरासरी दूधाचे प्रमाणही कमी झाले आहे. आठवडी बाजार बंद झाल्याने नवीन जनावरे बाजारपेठेमध्ये येत नसल्याने त्याचाही परिणाम झाला आहे. या सर्व कारणांमुळे दूधाचे उत्पादन व्हायला हवं होतं ते झालं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या