Kolhapur Football : भावाचा विषय हार्ड! कोल्हापुरात कट्टर फुटबाॅल समर्थकाच्या अख्ख्या घराच्या भिंती फुटबाॅलपटूंच्या हॅन्ड पेटिंगने सजल्या
Kolhapur Football : फुटबाॅल पंढरी असलेल्या कोल्हापुरात कट्टर फुटबाॅलप्रेमींकडून (Kolhapur Football) वर्ल्डकप सुरु झाल्यापासून बॅनर आणि कटआऊट्स लावण्याची स्पर्धा लागली आहे.
Kolhapur Football : फुटबाॅल पंढरी असलेल्या कोल्हापुरात कट्टर फुटबाॅलप्रेमींकडून (Kolhapur Football) वर्ल्डकप सुरु झाल्यापासून बॅनर आणि कटआऊट्स लावण्याची स्पर्धा लागली आहे. कोल्हापुरात नेमार, मेस्सी, रोनाल्डो तसेच भारतीय फुटबाॅलपटू सुनील छेत्री यांची भलतीच क्रेझ आहे. ही क्रेझ फुटबाॅल वर्ल्डकप सुरु झाल्यापासून दिसून येत आहे. मात्र, कोल्हापूर (Kolhapur) शहरातील एन.टी. सरनाईक नगर, रायगड कॉलनीमधील तुषार घाटगे या फुटबाॅलप्रेमीच्या अख्ख्या घरात फुटबाॅलपटूंच्या हँड पेटिंगने सजल्या आहेत. या सर्व हॅन्ड पेंटिंग रणधीर नांद्रे यांनी काढल्या आहेत.
तुषार हा सुद्धा पाटाकडील तालीम संघाकडून 2009 मध्ये खेळत होता. मात्र, दुखापतीने ग्रासल्याने तो सध्या फुटबाॅलपासून लांब आहे. मात्र, त्याचे फुटबाॅलप्रेम कमी झालेलं नाही. इतकंच नाही, तर त्यांच्या घराला फुटबाॅल खेळण्याची मोठी परंपरा आहे.
घाटगे घराण्याला फुटबाॅलची परंपरा
तुषारचे वडील सुधाकर उर्फ सदाशिव घाटगे 1980 ते 1990 या कालाखंडात पाटाकडील तालीम मंडळ संघाकडून व जिल्हा परिषद संघाकडून Right Back पोजिशनवर खेळले. त्यांना फुटबॉल खेळामुळेच जिल्हा परिषददेत नोकरी मिळाली. त्याचे काका रमेश घाटगे हे सुद्धा 1980 ते 1990 मध्ये पाटाकडील तालीम मंडळ संघाकडून व कोल्हापूर पोलिस संघाकडून मेन डिफेन्स या पोजिशनवर खेळले. त्यांनाही फुटबॉलमुळे पोलिसमध्ये नोकरी मिळाली. त्यांचे अन्य एक काका युवराज घाटगे हेही पाटाकडील तालीम मंडळ संघाकडून खेळले. तुषारचा चुलत भाऊ अभिजीत व घाटगे हेही पाटाकडील तालीम मंडळ संघाकडून खेळले आहेत. तुषारची बहिण दीक्षा घाटगे प्रायव्हेट हायस्कूलच्या फुटबॉल संघाकडून खेळली आहे. ती दोनवेळा राष्ट्रीय पातळीवर चमकली आहे.
'कतार'मध्ये छत्रपती शिवराय आणि लोकराजा राजर्षी शाहूंचा जयघोष
दरम्यान, फुटबाॅल वर्ल्डकपमधील आवडता संघ आणि खेळाडूंना समर्थन देण्यासाठी कोल्हापूर शहरातील एक कोपरा किंवा चौक शिल्लक राहिलेला नाही ज्या ठिकाणी पोस्टर्स किंवा कटआऊट्स लागलेले नाहीत. अगदी गल्लीमध्ये पताका सुद्धा लावण्यात आल्या आहेत.
हे सर्व सुरु असतानाच आपल्या तालमीचा झेंडा कतारच्या मैदानात नेऊन झळकवण्याचा पराक्रमही फुटबाॅल पंढरीतील (Kolhapur Football) फुटबाॅल वेड्यांनी केला आहे. कोल्हापूर शहरातील शिखर संस्था असलेली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचा झेंडाही कतारमध्ये झळकला. आताही तसाच प्रकार घडला आहे. मात्र, यावेळी कोणत्या तालमीचा झेंडा फडकला नसून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचा जयघोष कतारमध्ये झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या