Kolhapur News: कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांकडून शिवाजी चौकातच ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन
Kolhapur News: शिवाजी चौकात जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर शहरामध्ये रॅली काढण्यावर ठाम आहेत. मात्र त्याला कोल्हापूर पोलिसांनी त्याला विरोध केला आहे.
Kolhapur News: कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. त्यांनी आज कोल्हापूर बंदची (Kolhapur Bandh) हाक दिली आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आहेत. पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
मटण मार्केटमध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. शिवाजी चौकात जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर शहरामध्ये रॅली काढण्यावर ठाम आहेत. मात्र त्याला कोल्हापूर पोलिसांनी विरोध करत तुम्हाला या ठिकाणी जितक्या वेळ आंदोलन करायचं ते करा, असे आवाहन करत रॅलीला परवानगी देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. कोल्हापूर पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच संपूर्ण शहरात अत्यंत कडक बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाजी चौक परिसरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की कोल्हापूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौक परिसर वगळता इतर ठिकाणी परिस्थिती शांततेत आहे. इतर तालुक्यांमध्ये दुकाने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, कोल्हापूरमध्ये बंदी आदेश असतानाही आंदोलन होत असल्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, काल त्यांनी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते आंदोलन करत आहेत. आम्ही याबाबत रिस्पॉन्स करत आहोत. विद्यार्थ्यांसह कोणालाही त्रास होऊ नये, यासाठी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी संघटनांना केली.
पोलिसांनी समाजकंटकांना वेळीच ठेचावे
दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनी व्हाॅट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस लागल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर मुस्लीम संघटनांनी सुद्धा पत्रक प्रसिद्धीस देत पोलिसांनी समाजकटंकांना वेळीच ठेचावे, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे केली आहे. कोल्हापुरात मंगळवारी घडलेल्या प्रकारानंतर आज (7 जून) बंदची हाक देण्यात आली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत अशा घटना पुन्हा होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. मुस्लीम समाजाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही तरुणांनी लावलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूरच्या एकतेला तडा गेल्यासारखे वातावरण झालं आहे. पोलिसांनी अशा समाजकंटकांना वेळीच ठेचावे, त्यांना कडक शासन करावे, तरच अशा प्रवृत्ती पुन्हा निर्माण होणार नाहीत, असे पत्रकात म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या