Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी; पंचगंगा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली
Kolhapur Rain Update: धुवाँधार पावसाने पंचगंगा नदीवरील ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाने सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर हजेरी लावल्याने भात, सोयाबीन, भुईमूग पिकाला जीवदान मिळाले आहे.
कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून लंपडाव सुरु केलेल्या पावसाने मागील 48 तासात धुवाँधार हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळी आलेल्या पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला (Kolhapur Rain Update) झोडपले होते. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पावसाळा सुरु झाल्यापासून अपेक्षित पाऊस न झालेल्या शिरोळ तालुक्यातही पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपर्यंत सकाळी आठपर्यंत गेल्या 24 तासांत भुदरगड तालुक्यातील कडगाव, शिरोळसह पाच सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. धुवाँधार पावसाने पंचगंगा नदीवरील ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाने सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर हजेरी लावल्याने भात, सोयाबीन, भुईमूग पिकाला जीवदान मिळाले आहे. परतीची वेळ आली, तरी सप्टेंबर महिन्यात पाऊस नसल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सलग झालेल्या पावसाने दिलासा मिळाला.
आजही सायंकाळी पावसाची हजेरी
सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सलग दोन तास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे यापूर्वीच खड्ड्यात असलेल्या कोल्हापुरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. सखल भागात पाणी तुंबल्याने आणि भरीत भर सर्वत्र स्वागत कमानी असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे कोल्हापूर शहरात वाहतूक मंदावली.
कोल्हापुरात 3 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज
दरम्यान, सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यात 3 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दाजीपुरात ढगफुटीसदृश पाऊस
दुसरीकडे, मंगळवारी दाजीपुरात केवळ पाच तासांत तब्बल 137 मिलिमीटर पाऊस कोसळला. ढगफुटीसदृश पाऊसपाणीच पाणी झाले. यामुळे राधानगरी धरणातून वीजगृहासाठी 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. कुंभी, कासारी लघु पाटबंधारे परिसरातही अतिवृष्टी झाली.
कुंभी, कासारीतून विसर्ग सुरू
कुंभी आणि कासारी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असेल्याने 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कासारीतून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता कुंभी धरण प्रशासनाने वर्तवली आहे. दुसरीकडे, हातकणंगले, पुलाची शिरोली, तावडे हॉटेल, कसबा बावडा, शिये, कोल्हापूर शहर आणि त्यानंतर करवीर, गगनबावडा तालुक्यात टप्प्या-टप्प्याने झालेल्या पावसाने पाणीच पाणी केले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला.
इतर महत्वाच्या बातम्या