
Kolhapur Crime : लक्षतीर्थ वसाहत तलवार हल्ला प्रकरणातील फरार रिंकू देसाईला साथीदारासह अटक
कोल्हापूर शहरातील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये दोघांवर झालेल्या प्राणघातक तलवार हल्ल्याप्रकरणी रिंकू देसाईसह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्चस्ववाद आणि फलक लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता.

Kolhapur Crime : माझा वाढदिवस आहे. रिंगरोडला स्वतःच्या खर्चाने माझ्या वाढदिवसाचे पोस्टर लाव, नाही लावल्यास तर तुझ्याबद्दल मला वेगळा विचार करावा लागेल, अशी धमकी देऊन तलवार हल्ला प्रकरणात फरार झालेल्या रिंकु देसाई आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. विजयसिंह उर्फ रिंकू वसंतराव देसाई आणि त्याचा साथीदार नितेश तानाजी वरेकर यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी चिकोडीतून ताब्यात घेत अटक केली.
तलवार हल्ला झाल्यानंतर रिंकू देसाई आणि वरेकर फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांकडून शोधमोहिम सुरु होती. संशयितांच्या शोधासाठी दोन पथके तैनात करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक संतोष जाधव आणि पोलिस उपनिरीक्षक इक्बाल महात यांच्या पथकाने कारवाई केली.
काय आहे प्रकरण ?
कोल्हापूर शहरातील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये दोघांवर झालेल्या प्राणघातक तलवार हल्ल्याप्रकरणी रिंकू देसाईसह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्चस्ववाद आणि फलक लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. कृष्णात कोंडीबा बोडेकर (वय २७) हे लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहतात. त्यांच्या शेजारी संतोष सोनबा बोडके राहतात. रिंकू देसाईच्या वाढदिनी रिंकूने कृष्णांत व संतोष यांना माझा वाढदिवस आहे. रिंगरोडला स्वतःच्या खर्चाने माझ्या वाढदिवसाचे पोस्टर लाव, नाही लावल्यास तर तुझ्याबद्दल मला वेगळा विचार करावा लागेल अशी धमकी दिली.
त्यानंतर कृष्णात यांच्यावर तलवार, गज, दगड, लाकडी दांडक्याने हल्ला केला, शेजारी राहणाऱ्या संतोष यांनाही मारहाण केली. यामध्ये ते दोघे गंभीर झाले. याबाबत कृष्णात यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
