Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचे सांत्वन करण्यासाठी चार केंद्रीय मंत्री कोल्हापूर दौऱ्यावर, खासदार धनंजय महाडिकही सोबत
चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी काल निधन झाले. चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी राज्यातील नेत्यांसह केंद्रीय मंत्री सुद्धा पोहोचत आहेत.

Eknath shinde in Kolhapur : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने काल निधन झाले. चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी राज्यातील नेत्यांसह केंद्रीय मंत्री सुद्धा पोहोचत आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भारती पवार, रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक हेदेखील केंद्रीय मंत्र्यांसोबत दिल्लीहून कोल्हापूरसाठी रवाना होतील.
हे सर्व मंत्री आणि खासदार धनंजय महाडिक आज सायंकाळी सातच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांच्या घरी जाऊन सांत्वन करणार आहेत. खासदार मनोज कोटक, संजयकाका पाटील, उन्मेश पाटील आणि रक्षा खडसे हे सुध्दा आज कोल्हापुरला येत आहेत. सायंकाळी 7 वाजता हे सर्व मान्यवर चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतर रात्री महाडिक यांच्या निवासस्थानी भोजन घेवून दिल्लीला परतणार आहेत.
काल चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन
दरम्यान, काल पंचगंगा स्मशानभूमी येथे सरस्वती पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे.
चंद्रकांत पाटील काल कोल्हापूरमध्ये होते. त्यांची भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत सायंकाळी सहा वाजता बैठक होती. त्यापूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. मात्र, बैठकीला जाण्यापूर्वी आपण आईंना भेटून येतो असे चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर ते आईला भेटण्यासाठी संभाजीनगर येथील निवासस्थानी गेले. आईंना भेटल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी निघतानाच त्यांच्या मातोश्रींनी अखेरचा श्वास घेतला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
