Hasan Mushrif : माजी मंत्री हसन मुश्रीफांनी दोन म्हशी घेतल्या आणि स्वत:च कागलच्या गैबी चौकात त्यांचे स्वागत केले!
Hasan Mushrif : आधीच्या आठ आणि नवीन दोन अशा दहा म्हशी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गोठ्यात आहेत. जिल्ह्याबाहेरील बाजारातून आणलेल्या या दोन म्हशीचे मुश्रीफ यांनी गैबी चौकात स्वागत केले.
Hasan Mushrif : आठवड्यापूर्वीच आमदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या संचालक व कर्मचाऱ्यांना दूध उत्पादन वाढीसाठी नवीन म्हशी घेण्याचे व त्याची सुरुवात स्वतःपासूनच करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मुश्रीफ यांनी स्वतःच नवीन दोन म्हशी घेत या उपक्रमाची सुरुवात स्वतःपासून केली. आधीच्या आठ आणि नवीन दोन अशा दहा म्हशी मुश्रीफांच्या गोठ्यात आहेत. जिल्ह्याबाहेरील बाजारातून आणलेल्या या दोन म्हशीचे मुश्रीफ यांनी गैबी चौकात स्वागत केले.
दरम्यान, गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची वरदायिनी आहे. या संघासमोर असलेले अमूल दूधचे आव्हान गोकुळ दूध संघाचे दूध उत्पादक शेतकरीच परतवून लावतील, असा विश्वास आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
गोकुळ दुधाचा ब्रँड हा अमूलपेक्षाही मोठा होईल
मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ दूध संघाची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात येऊन एक वर्ष झाले. संघाने एक वर्षात केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा आम्ही यापूर्वीच मांडलेला आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये २० लाख लिटर म्हशीच्या दुधाचे मार्केट उपलब्ध असल्याची, आमची आत्ता खात्री झालेली आहे. अशातच अमूल दूध संघासारखे फार मोठे आव्हान गोकुळ दूध संघासमोर उभे आहे. त्यामुळेच म्हशीचे दूध वाढविण्यामध्ये जर यशस्वी झालो, तर गोकुळ दुधाचा ब्रँड हा अमूलपेक्षाही मोठा होईल.
अमूल दूध संघाने नाशिकमध्ये नुकतीच 850 एकर जमीन घेतलेली आहे. तिथे ते म्हशीचा प्रकल्प उभारणार आहेत. तिथे उत्पादित म्हैशीचे दूध मुंबई बाजारात आणून गोकुळचे मार्केट ताब्यात घेण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. अमूलसारखा एवढा मोठा प्रकल्प तर आम्ही उभा राहू शकत नाही. परंतु; त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हैशीचे दूध उत्पादनवाढ करावीच लागेल. गोकुळच्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखावर आहे. त्यापैकी चौथाई म्हणजे सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक -एक म्हैस जरी घेतली तरी अमूलचे आव्हान परतवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.
एक म्हैस घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे
आठवड्यापूर्वीच संचालक मंडळाच्या उपस्थितीत आम्ही दूधवाढीसाठी कार्यशाळा घेतली. त्यामध्ये आम्ही संकल्प सोडला की नेत्यानी व संचालकानी प्रत्येकी दोन म्हशी घेतल्या पाहिजेत, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक म्हैस घेतलीच पाहिजे. शेतकऱ्यांनाही एक म्हैस घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. केडीसीसी बँक त्यासाठी लागेल ते अर्थसहाय्य करील. गोकुळ दूध संघही त्यासाठी जास्तीत जास्त अनुदान देईल.
म्हशी पंढरपुरी, मुरा, मेहसाणा अशा जातीच्या आणाव्या लागतील. जिल्ह्यातील म्हशी खरेदी करून दूध उत्पादन वाढ होणार नाही.
दूध उत्पादन वाढीसाठी प्रत्येकाने एक -एक म्हैस घेतलीच पाहिजे. पुढच्या टप्प्यात 50 टक्के शेतकऱ्यांपर्यंत आपण ही मोहीम राबविली, तर निश्चितच नव्याने दहा लाख लिटर दूध उत्पादन वाढेल. गेल्या वर्षापासून आम्ही सत्तेवर आल्यानंतर म्हशीच्या दुधाला सहा रुपये आणि गाईच्या दुधाला पाच रुपये दरवाढ केले आहे. या वेळेला चांगला दूध दरफरक देण्याचा मानस चेअरमन आणि संचालक मंडळांने केलेला आहे. या दूध उत्पादन वाढीच्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहकार्य करा. गोकुळ हा देशातील एक नंबर ब्रँड होण्यासाठी हातभार लावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गुणवत्ता व चव गोकुळचीच
मुश्रीफ पुढे म्हणाले की, गुणवत्ता आणि चवीमध्येही गोकुळ नेहमीच आघाडीवर आहे. दर्जेदार व चवदार दूध हा इथल्या मातीचा आणि पाण्याचा परिणाम आहे. लहान मुलंसुद्धा बाटलीत गोकुळ दूध नसेल तर ती बाटली फेकून देते. तसेच बहुतांशी अमृततुल्य चहावाल्यांकडेही गोकुळ दूध असते.