Kolhapur News : 'त्रिदेव अजिंक्य'! कोल्हापुरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फिल्मी स्टाईल बॅनर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांचा एकत्रित फोटो बॅनरवर असून यशस्वी कारभाराचा दाखला देत ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) दणका दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महायुतीने (Mahayuti) लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) माध्यमातून पहिला हप्ता राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात हस्तांतरित केला. पुण्यामध्ये (Pune) जंगी कार्यक्रम करून या योजनेची औपचारिकपणे सुरुवात करण्यात आली. दरम्यान, योजना यशस्वी होत असल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur Tridev Ajinkya Banner) याच पार्श्वभूमीवर आता 'त्रिदेव अजिंक्य' म्हणून बॅनर झळकले आहेत.
कोल्हापूर शहरात फिल्मी स्टाईलने बॅनर
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात फिल्मी स्टाईलने बॅनर लावले आहेत. 'त्रिदेव अजिंक्य' असा मजकूर असलेले बॅनर कोल्हापूरमध्ये लागले असल्याने चर्चेचा विषय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांचा एकत्रित फोटो बॅनरवर असून यशस्वी कारभाराचा दाखला देत ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
महायुतीकडून प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरमधून केला जाणार
लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केल्यानंतर आता महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवरच महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ या आठवड्यात कोल्हापूरमधून केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आमदार, खासदार कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणार आहेत. या दौऱ्यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाईल. या सर्व पार्श्वभूमीवर ही फिल्मी स्टाईलने बॅनरबाजी करण्यात आली आहे.
घरपोहोच सेवा देणारा कोल्हापुरातील पथदर्शी प्रकल्प राज्यात राबवणार
दरम्यान, राज्य शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणारा कोल्हापुरातील पथदर्शी प्रकल्प राज्यातील अन्य जिल्ह्यातही राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी केले. प्रकल्पामुळे शासनाच्या विविध सेवा नागरिकांच्या घरोघरी वेळेत जातील. नागरिक व प्रशासनामध्ये चांगले नाते निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे झाले.
यावेळी प्रकल्पाची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे अनावरण तसेच क्यूआरकोड, मदतीसाठीचा टोल फ्री क्रमांक, सेवांच्या माहितीसाठी व्हॉट्सॲप चॅटबोट यांचे अनावरण झाले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देशाच्या 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलदिनी आपण लोकाभिमुख, राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मभूमीतून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. सेवांचा प्रभावी वापर होऊन कायदा लोकापर्यंत पोहचला पाहिजे. यावेळी त्यांनी पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात सुरू केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे, प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणारे आमदार प्रकाश आबिटकर तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ व राज्य उत्पादक शुल्क मंत्री, शंभूराजे देसाई यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
इतर महत्वाच्या बातम्या