Ajit Pawar : शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर 50 हजार अनुदान मिळणार तरी कधी? अजित पवारांनी कोल्हापुरात केली घोषणा!
Ajit Pawar : अजित पवार यांचा नागरी सत्कार तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्याकडून चंदगड नगरपंचायतीला 10 कोटीचा निधी जाहीर करण्यात आला.
कोल्हापूर : वंचित शेतकऱ्याना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, अशी मागणी होती. 70 हजारांहून अधिक शेतकरी या योजनेपासून वंचित होते, त्यांना आम्ही मदत करण्याचे ठरविले आहे, लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) आचासंहितेपूर्वी प्रोत्साहन अनुदान 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यात केली. पाण्याचे दर कमी करावेत अशी शेतकऱ्याची मागणी होती, आम्ही ते दर कमी करून पूर्ववत केली आहेत, असेही ते म्हणाले.
अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड (Chandgad) आणि गडहिंग्लज (Gadhinglaj) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचा नागरी सत्कार तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्याकडून चंदगड नगरपंचायतीला 10 कोटीचा निधी जाहीर करण्यात आला. घड्याळ तेच पण वेळ नवी असे धोरण ठरवून आम्ही काम करत आहोत. कायदा सुव्यवस्थेचा बाबतीत विरोधक आरोप करत आहेत, अशा घटना घडत आहेत, पण या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत. कोणी मोठ्या बाबाचा असला, तरी कायदा आणि संविधान सर्वश्रेष्ठ आहे. दादागिरी आणि गुंडगिरीला बळी पडू नका, असेही ते म्हणाले.
आम्ही देखील साठीच्या पुढे गेलो, आम्हाला कधी संधी मिळणार?
अजित पवार म्हणाले की, आम्ही वेगळी भूमिका घेऊन जात आहोत. मात्र, वरिष्ठांचा आम्ही कायम आदर ठेवू. आम्ही देखील साठीच्या पुढे गेलो आम्हाला कधी संधी मिळणार? अशी विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढत आहोत. कोल्हापुरात हजारो कोटींचे रुग्णालय होत असल्याने गोरगरिबांना याचा फायदा होईल. कोरोनासारखा आजार कधी उद्भवेल सांगता येत नाही, त्यामुळे संध्याकाळ झाली की चंद्रावर जाण्याची गरज नाही. तांबडा पांढरा रस्सा घ्या पण निर्व्यसनी रहा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला. त्यांनी पुढे सांगितले की, सीमाभागातील मराठी शाळांना मदत केली पाहिजे. त्या शाळा कशा चांगल्या होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहो. नरेंद्र मोदी शिवजयंती दिवशी महाराष्ट्रात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे भोसलेंचे नव्हते तर रयतेचे होते. महायुतीच्या काळातही आम्ही चांगले काम करत आहोत. मी माझा स्वतःचा नाही तर समजाचा विचार करतो, अनेक संधी मला मिळाल्या. पाच पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, आम्ही सत्तेला हपापलेलो नाही.
सत्ता येत असते, जात असते, कोणी ताम्रपट घेवून येत नाही
बहुजन समाजातील तळागाळातील लोकाचे कामं झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माणसे वाचवंणं, सर्व प्रकारच्या सोयी देणे हे आमचे काम आहे. सत्ता येत असते, जात असते, कोणी ताम्रपट घेवून येत नाही. आजच्या घडीला देशात नरेंद मोदी यांच्या शिवाय देशाला पुढं नेणारा नेता दिसत नाही. अनेक योजनेच्या माध्यमातून लोकांचा विकास केला. गडहिंग्लज तालुक्यातील 95 गावे दुष्काळी गावात येतात, त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही काम करत असताना कोणाचा अवमान व्हावा किंवा त्रास व्हावा, अशी माझी किंवा माझ्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. इतरांना त्रास न होता आरक्षण मिळायला पाहिजे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. आजपर्यंत राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळाले नाही, पण आमची इच्छा होती, हसन मुश्रीफ हे पालकमंत्री व्हावेत, असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या