Kolhapur News : नरसोबावाडीच्या दत्त मंदिरातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
Nrusinhawadi Datta Temple : दक्षिणद्वार सोहळ्यानंतर दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. श्रींची मूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे.
Kolhapur News : कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी (Nrusinhawadi) मंदिरात आज (23 जुलै) दुपारी एक वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. दक्षिणद्वार सोहळ्यानंतर दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, श्रींची मूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे. नृसिंहवाडी आणि औरवाड यांना जोडणारा जूना पूल पाण्याखाली गेला आहे.
दक्षिणदार सोहळ्यानंतर स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी
मंदिरात दत्त महाराजांच्या पादुकांजवळ महापुराचे पोहोचल्यानंतर हा दक्षिणद्वार सोहळा संपन्न होतो. मागील वर्षी साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यातच दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला होता. मात्र, यावेळी पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे आतापर्यंत दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला नव्हता. महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. दक्षिणद्वार सोहळ्यानंतर स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली आहे.
भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या आणि श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. दक्षिणद्वार सोहळा झाल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानकडून जास्त सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाल्यानंतर अधिक मास आणि रविवार असल्याने हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने कृष्णा नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली आहे.
पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर
दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur News) पावसाने जोर पकडल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज दुपारी तीनपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 38 फुट 2 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 आणि धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना आता जिल्हा प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायतकडूनही वेळीच स्थलांतरीत होण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापुरात महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावात सध्या ग्रामपंचायतकडून स्पीकरच्या सहाय्याने आवश्यक साहित्यासह आज (23 जुलै) सायंकाळपर्यंतच गाव सोडण्यासाठी सांगितलं जात आहे.