Gokul : 'गोकुळ'कडून गायीच्या दूध दराला कात्री; कोल्हापुरात शेतकऱ्यांसह संघटनांचा आक्रोश सुरुच, आता शिरोळमध्ये चिलिंग सेंटर बंद पाडले
गायीच्या दूध खरेदी दरात अचानक दोन रुपयांची कपात करण्यात आल्यानंतर उत्पादक शेतकऱ्यांसह संघटनांचा आक्रोश सुरुच आहे. गायीचा दूध पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur News) दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळकडून (Gokul) गायीच्या दूध खरेदी दरात अचानक दोन रुपयांची कपात करण्यात आल्यानंतर उत्पादक शेतकऱ्यांसह संघटनांचा आक्रोश सुरुच आहे. गायीचा दूध पूर्ववत करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील संघटनांकडून करण्यात येत आहे. गोकुळने अजून याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मात्र, दुसरीकडे विविध संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा घेत दबाव वाढवला आहे. आज शिरोळ तालुक्यातील गोकुळचे चिलिंग सेंटर आंदोलन अंकुशकडून बंद पाडण्यात आले. यावेळी दूध वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवण्यात आला.
म्हशीच्या दूध खरेदी दरात दीड रुपयांनी वाढ; गायीच्या दूध खरेदी दरात कपात
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी गोकुळकडून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दूध खरेदी करण्यात वाढ केली असली, तरी गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये कपात केली होती. राज्यात खासगी व इतर दूध संघांचे गायीच्या दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. बाजारपेठेत दुध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले असून याबाबींचा विचार करुन गाय दूध खरेदी दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी पत्रकात म्हटले होते. मात्र, शेतकऱ्यांनी या गायीच्या दुधात कपात केल्यानंतर आक्रोश सुरु केला आहे. दिवसागणिक दुग्ध व्यवसाय संकटात जात असतानाच गोकुळकडून अचानक दर कपात करण्यात आल्याने गोटा बांधून दुग्ध व्यवसाय सुरु केलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे दर वाढवून नसला, तरी आहे तो दर पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बोरवडेतील शीतकरण केंद्राची मोडतोड
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी, मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी गोकुळ दूध संघाच्या बोरवडे (ता. कागल) येथील शीतकरण केंद्राची मोडतोड केली होती. आंदोलकांनी खिडकीच्या काचा फोडत शाखाप्रमुखांच्या टेबलाची तोडफोड केली. झेंड्याच्या काठीने मारहाण केल्याने गोकूळचे तीन कर्मचारी जखमी झाले. याबाबत शाखाप्रमुख विजय कदम यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दरकपात रद्द करुन गाय दूधदर पूर्ववत करावा या मागणीसाठी मनसेचे 10 ते 15 कार्यकर्ते बोरवडे शीतकरण केंद्रावर आले होते. संकलन सुरु असल्याने शाखाप्रमुख विजय कदम यांनी त्यांना चर्चेसाठी त्यांच्या कक्षात बोलावले. चर्चा सुरु असतानाच कार्यकर्त्यांनी खोलीच्या खिडकीच्या काचा फोडल्या. शाखाप्रमुखांच्या टेबलाचीही काच फोडून त्याची मोडतोड केली. या फुटलेल्या काचा उडून उपस्थित कर्मचार्यांना लागल्याने ते जखमी झाले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन कर्मचार्यांनाही झेंड्याच्या काठीने मारहाण करत जखमी केले. मारहाणीत कर्मचारी जखमी झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
