Satej Patil on Raju Shetti : साखरपुडा झाला, पण लग्न झालं नाही; राजू शेट्टींची चर्चा कुठं अडली? सतेज पाटील काय म्हणाले??
महाविकास आघाडीची ताकद हातकणंगले मतदारसंघांमध्ये आहे. शिरोळ, हातकणंगले, शिराळा, शाहुवाडी, वाळवा आणि इस्लामपूरमध्ये महाविकास आघाडीची ताकद असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
![Satej Patil on Raju Shetti : साखरपुडा झाला, पण लग्न झालं नाही; राजू शेट्टींची चर्चा कुठं अडली? सतेज पाटील काय म्हणाले?? Congress MLA Satej Patil clarified his position on the situation in Hatkanangle Lok Sabha constituency says We wanted Raju Shetti to come with mahavikas aghadi Satej Patil on Raju Shetti : साखरपुडा झाला, पण लग्न झालं नाही; राजू शेट्टींची चर्चा कुठं अडली? सतेज पाटील काय म्हणाले??](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/9ac71d421cc4728a986c6baf4390d29d1712221409764736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती. शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची दोनवेळा मातोश्रीवर भेट घेऊन बाहेरून पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र थेट आता ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आल्याने आता या मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत झाली आहे. त्यामुळे या जागेचा निकाल कसा असणार? याचे उत्तर चार जून रोजीच मिळणार आहे.
साखरपुडा झाला, पण लग्न झालं नाही
या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्थितीवरून भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की ही जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे, त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे. राजू शेट्टींच्या चर्चेला अंतिम स्वरूप देता आलं नाही. मात्र, महाविकास आघाडीची ताकद या मतदारसंघांमध्ये आहे. शिरोळ, हातकणंगले, शिराळा, शाहुवाडी, वाळवा आणि इस्लामपूरमध्ये महाविकास आघाडीची ताकद असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही असे सतेज पाटील मिश्किलपणे म्हणाले. त्यामुळे फटका कोणाला बसणार हे सांगता येणार नाही, पण महाविकास आघाडीची ताकद बेदखल करून चालणार नसल्याचे त्यांनी सुचित केले.
महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून सुद्धा तिढा कमालीचा वाढला आहे. काँग्रेसचे नेतृत्व गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या संपर्कात असून या ठिकाणी ठाकरेंनी दिलेला उमेदवार माघार घ्यावा अशी मागणी सुरु आहे. या अनुषंगाने बोलताना पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. लवकर या संदर्भातील तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, विश्वजित कदम यांचा प्रयत्न प्रामाणिक असून त्यांची नाराजी स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रात यश मिळेल
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण असल्याचे सतेज पाटील म्हणाले. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण असून सांगलीचा तिढा सुद्धा लवकर सुटेल असे ते म्हणाले. साताऱ्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील जनतेचा उमेदवार आम्ही दिला असून भाजीवाल्यापासून ते नोकरदार वर्गापर्यंत धंगेकरांचे नाव तोंडात असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू
शक्तीपीठ महामार्गावरून पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, या महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठेकेदार धार्जिण हा मार्ग असून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी हा मार्ग केला जात आहे. कोल्हापूर धाराशिव जिथून हा महामार्ग जात आहे तेथील शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे, त्यामुळे हा महामार्ग रद्द करून पर्यायी मार्गांचा विचार केला पाहिजे. ज्या तीर्थक्षेत्रांना महामार्ग जोडणार आहे त्या ठिकाणी हा निधी गेला पाहिजे. या महामार्गावर पैसे खर्च करण्यापेक्षा तीर्थक्षेत्रावर पैसे खर्च करा अशी मागणी पाटील यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)