Nashik Crime: मामा राजवाडे, अजय बागुलनंतर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' घेतलं वदवून
Nashik Crime: गंगापूर रोड गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Nashik Crime: गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चेचा विषय ठरलेल्या गंगापूर रोड गोळीबार प्रकरणात (Gangapur Road Firing Case) मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक असलेला अजय बोरिसा (Ajay Borisa) याला अखेर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अटक केली आहे. अजय बोरिसाला "नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला, असे वदवून घेत पोलिसांनी कोर्टात हजर केलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर रोडवरील विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहर हादरलं होतं. या घटनेत राजकीय वजन असलेल्या काही व्यक्तींचा सहभाग असल्याने प्रकरण अधिकच गाजू लागलं. या प्रकरणात आतापर्यंत भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल, तसेच मामा उर्फ वाल्मिक राजवाडे, पप्पू जाधव, आणि इतर नऊ संशयितांना अटक झाली आहे.
Ajay Borisa Arrested: अजय बोरिसाला अटक
अजय बोरिसा हा या प्रकरणातील एक मुख्य सूत्रधार मानला जात होता, मात्र तो घटनेनंतर फरार झाला होता. त्याचा शोध पोलीस मागील अनेक दिवसांपासून घेत होते. अखेर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकत, न्यायालयात हजर केलं. यावेळी पोलिसांनी अजय बोरिसाकडून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला,’ असे वदवून घेतले. तर या प्रकरणातील गोळी झाडणारा आरोपी तुकाराम चोथवे हा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला आहे. तुकाराम चोथवेला अटक करण्यात पोलिसांना यश कधी येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Pavan Pawar: रिल प्रकरणी पवन पवारवर गुन्हा दाखल
दरम्यान, नाशिकच्या जेलरोड येथील माजी नगरसेवक पवन पवार व त्याच्या साथीदाराविरुद्ध "कोणी लागत नाही नादी," असे रील तयार करून सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरविल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केलाय. नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यात स्वतःचे शुभेच्छा फलक अवैधरीत्या लावल्याप्रकरणी पवन पवार व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यातच पवन पवारसह संशयित वतन ब्रह्मानंद वाघमारे व त्यांचे साथीदार सोहेल पठाण, तथागत, आशिष वाघमारे, नीलेश भोसले यांनी त्यांचे फोटो वापरून या रीलद्वारे 'कोणी लागत नाही नादी, मोठे लोक आमच्याकडे येतात, ओजीवाले गँगस्टर...' अशा शब्दांत रील तयार केले होते. या संदर्भात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत थेट माजी नगरसेवक पवन पवार याच्यावरच पुन्हा एकदा गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा


















