(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde on Shashikant Warise : पत्रकार शशिकांत वारिसेंवर हल्ला करणाऱ्यांना कुणीही पाठीशी घालणार नाही, कायद्याने शिक्षा होणारच; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही, आरोपीला कायद्याने शिक्षा होणार असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली.
CM Eknath Shinde on Shashikant Warise : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही, आरोपीला कायद्याने शिक्षा होणार असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कणेरी मठावर होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शशिकांत वारिसे हत्या प्रकरणावर भाष्य केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पत्रकार जीव धोक्यात घालून काम करत असतात. हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. त्यामुळे पत्रकार वारिसे यांच्यावर हल्ला करणाऱ्याला कोणत्याही प्रकारे पाठिशी घातलं जाणार नाही. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होणारच असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया दिली नाही. ते म्हणाले की, मला राजकीय वक्तव्याला उत्तर द्यायचे नाही, पण जे दोषी असतील त्यांना पाठीशी घालू नका अशा सूचना दिल्या आहेत.
...तर राजकारण सोडून देईन
दरम्यान, पत्रकार वारिसे यांच्या प्रकरणी आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant on Sanjay Raut) उत्तर दिले आहे. सामंत यांनी म्हटले आहे की, ट्विट करण्यात आलेला माझा फोटो जुना आहे. मंत्री म्हणून कोणीही येऊन फोटो काढतात तसाच तो फोटो असल्याचा दावा सामंत यांनी केला. आता, वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात बदनामीकारक घाणेरडं राजकारण सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोपीला कोणतीही व्हीआयपी ट्रीटेमेंट दिली गेली नसल्याचे ते म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकार वारिसे यांना न्याय देईल. त्याशिवाय पालकमंत्री म्हणून शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी कोणी जमीन खरेदी केली, याची चौकशी आणि नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्याला माझा पाठिंबा असून ही यादी जाहीर झाली पाहिजे. माझ्या नावावर एक इंच जमीन सापडली, तरी राजकारण सोडून देईल, असे सामंत यांनी आव्हान दिले.
एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश
दरम्यान, पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. फडणवीस यांनी वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या