(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर प्रथमच दौरा
चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
CM Eknath Shinde In Kolhapur : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर दौऱ्यात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर कोल्हापुरातून दोन्ही खासदार तसेच एकमेव आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला कोल्हापुरात खिंडार पडले आहे. कोल्हापुरात लोकप्रतिनिधी शिंदे गटात आणि निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे गटात अशी स्थिती झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरु झाल्याची (Maharashtra Cabinet expansion) चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Kolhapur) उद्या (19 फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा निर्णय झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विस्तार करण्याकडे शिंदे फडणवीस सरकारचा विचार असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधली आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारच होत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शिंदे गटामध्ये उत्साह संचारला असून त्यामुळे मंत्रिमंडळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमित शाह उद्या कोल्हापुरात
दुसरीकडे, अमित शाह यांची सासूरवाडी कोल्हापूर आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अमित शाह यांचे कोल्हापूर कनेक्शन म्हणजे त्यांच्या पत्नी सोनल शाह या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. म्हणजेच अमित शाह कोल्हापूरचे जावईबापू आहेत. त्यामुळे होम मिनिस्टरांच्या आग्रहामुळे अमित शाह रविवारी (19 फेब्रुवारी) कोल्हापूरमध्ये येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. लोहिया शाळेमध्ये शिकल्या आहेत. सोनल शाह यांचे पाहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतले आहे. त्यामुळे आजही सोनल शाह आपल्या मित्र मैत्रिणींच्या संपर्कात आहेत. त्यांना आजही शाळेबद्दल आपुलकी आहे. त्यामुळे सोनल भाभी ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेच्या संस्थेचं यंदा शताब्दी वर्ष साजरे होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या