Kolhapur Crime : दोन नाईट पँट चोरून बॅगमध्ये घालताना रंगेहाथ पकडलं म्हणून मित्रांना बोलावून दुकानदारालाच केली मारहाण, पाच जण जखमी
कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानातून नाईट पँटा चोरताना रंगेहाथ पकडल्यानंतर मित्रांना बोलून दुकादाराला काठीने मारहाण केल्याची घटना कोल्हापुरातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगरमध्ये घडली.

Kolhapur Crime : कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानातून नाईट पँट चोरताना रंगेहाथ पकडल्यानंतर मित्रांना बोलून दुकानदाराला काठीने मारहाण केल्याची घटना कोल्हापुरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगरमध्ये घडली. गांधीनगरातील वंजाणी गारमेंट या दुकानात येऊन खरेदीच्या बहाण्याने कपडे चोरणाऱ्या जय गोसावीला रंगेहाथ पकडण्यात आले. चोरी पकडल्यानंतर त्याने आणखी सात ते आठ मित्रांना बोलावून घेऊन दुकानमालक सुनील सदोरामल वंजाणी, त्यांचे भाऊ सूरज वंजाणी, अमर वंजाणी, आशिष वंजाणी आणि ओम जितेंद्र कुबडे यांना काठीने मारहाण करून जखमी केले. यानंतर सुनील वंजाणी यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी पावणेनऊच्या सुमारास जय गोसावी हा वंजाणी गारमेंट या दुकानात खरेदीसाठी आल्यानंतर नाईट पँटचे दोन नग चोरून आपल्या बॅगेमध्ये घातले. दुकान मालक सुनील यांनी पाहून विचारणा केली. यानंतर त्याने आपल्या 7 ते 8 साथीदारांना बोलावून फिर्यादी दुकान मालक आणि त्यांच्या मित्रांना काठीने मारहाण केली. यामध्ये पाचजण जखमी झाले. याबाबत गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यास कोल्हापुरात महापालिकेत मारहाण
दुसरीकडे, आज कोल्हापूर महापालिकेच्या चौकात कोल्हापूर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यास मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली. शिवाजी पेठ परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. ही घटना आज दुपारच्या सुमारास महापालिकेत घडल्याने एकच खळबळ उडाली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कृती समितीचे निमंत्रक महापालिकेत शिष्टमंडळासोबत माहिती घेण्यासाठी आले होते. यावेळी शिवाजी पेठ परिसरातील कार्यकर्त्यांनी संबंधित निमंत्रकास माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून आंदोलन का करता असा जाब विचारत मारहाण केली. अद्याप मात्र या घटनेची नोंद पोलिसात झालेली नाही.
फॅमिली सेक्शनमध्ये बसण्यावरून हाॅटेल मालकाला मारहाण
दरम्यान, 10 जानेवारी रोजी पाचगाव हद्दीतील गिरगावच्या खडीला असणाऱ्या हाॅटेलमध्ये कुख्यात डीजेचा मुलगा सुजित जाधव आणि त्याच्या साथीदारांनी नंगानाच करत हाॅटेल मालकासह त्यांच्या मुलाला मारहाण केली. हाॅटेल कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. या गंभीर प्रकारानंतर हाॅटेल मालक विक्रमसिंह प्रभाकर क्षत्रिय (रा. रामानंदनगर, कोल्हापूर) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्याने मारहाण करतानाच पाचगाव आमच्या मालकीचं आहे, हाॅटेल कसं चालवतोस तेच बघतो, रोज येऊन तोडफोड करणार इतक्यापर्यंत जाऊन धमकीही दिली. यापूर्वीही एक दोनवेळा डीजेच्या मुलाकडून विक्रमसिंह यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
