Kolhapur News: कोल्हापूरच्या विकासासाठी मोठे उद्योग आणा; उद्योजकांचे उद्योग मंत्री उदय सामतांना साकडे
उद्योग विस्तार आणि विकास होण्यासाठी मोठे उद्योग कोल्हापुरात आणावेत अशी मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
Kolhapur News: कोल्हापूरची उद्योग परंपरा स्वातंत्रपूर्व काळापासून आहे. अनेक सूक्ष्म,लहान व मध्यम उद्योग या ठिकाणी कार्यरत आहेत. परंतु मोठे उद्योग नसल्याने उद्योग विस्तार व विकास ज्याप्रमाणात होणे आवश्यक होता, त्या प्रमाणात झाला नाही. अनेक समस्यांचा सामना करत उद्योग कसेबसे सुरू आहेत. उद्योग विस्तार आणि विकास होण्यासाठी मोठे उद्योग कोल्हापुरात आणावेत अशी मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. तसेच यासाठी पूर्ण क्षमतेने विमानसेवा, कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी विमानसेवा सकाळी आणि रात्री सुरू करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला. कोल्हापूरच्या उद्योग विस्तारासाठी मोठे उद्योग आणण्याचे नक्कीच प्रयत्न करू, विमानसेवाही पूर्ण क्षमतेने सुरू करू. विमानसेवा सुरू झाल्यास उद्योजकांना निर्यातीसही चालना मिळेल यात शंका नाही. मंजूर नविन एमआयडीसी आणि प्रस्तावित एमआयडीसीबाबत मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. जमिनीचा ताबा घेण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे भविष्यात कोल्हापूर मोठे उद्योग येण्यास संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी ललित गांधी, दिनेश बुधले, सोहन शिरगावकर, संजय शेटे, दीपक चोरगे, हरिशचंद्र धोत्रे, प्रदीपभाई कापडिया, क्रिडाईचे संदीप मिरजकर, प्रदीप व्हरांबळे, औद्योगिक व व्यापारी संस्थचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘स्मॉल स्केल’साठी नव्या एमआयडीसीमध्ये 15 टक्के जागा राखीव
दुसरीकडे, उद्योगविस्ताराच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला गती देण्याचे काम राज्य सरकारचा उद्योग विभाग करत आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांमध्ये पुढील सहा महिन्यांत नव्या एमआयडीसींची उभारणी करून उद्योगविस्ताराला बळ दिले जाईल. या एमआयडीसींमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी 15 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात शासन आपल्या दारी कार्यक्रमात केली आहे. सामंत म्हणाले की, मागील सरकारने कोल्हापुरातील एमआयडीसींकडे दुर्लक्ष केले. आम्ही या एमआयडीसींमधील पायाभूत सुविधांसाठी 100 कोटींचा निधी दिला आहे.
रोजगार मेळाव्यात 532 उमेदवारांची प्राथमिक तर 14 उमेदवारांची अंतिम निवड
शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तपोवन मैदानात आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय कार्यक्रमातील रोजगार मेळाव्यात 532 उमेदवारांची प्राथमिक फेरीत तर 14 उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा घेण्यात आला. यामध्ये 1829 रिक्त पदांसाठी 16 कंपन्या सहभागी झाल्या. या मेळाव्यात 791 उमेदवारांनी मुलाखती दिल्यानंतर 546 उमेदवारांची प्राथमिक व अंतिम निवड झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या