Kolhapur Weather : कोल्हापुरात गेल्या 24 तासांपासून तापमानात मोठी घट; थंडीचा कडाका अचानक वाढला
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या वातावरणात गरमी जाणवत असतानाच गेल्या 24 तासांपासून तापमानात तब्बल 4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारठा जाणवू लागला आहे.
Kolhapur Weather : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या वातावरणात गरमी जाणवत असतानाच गेल्या 24 तासांपासून तापमानात तब्बल 4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. रात्रीचा पारा तब्बल 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने वातावरणात चांगलीच बोचरी थंडी जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूरमध्ये थंडी जाणवत आहे. रविवारी दिवसभरात तापमानात दोन अंशाने घसरण झाल्यानंतर रात्रीही आणखी दोन अंशाने पारा घसरल्याने हुडहुडी जाणवू लागली. चार अंश सेल्सिअसने पारा घसरल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्रीची वर्दळही मंदावल्याचे दिसून आले. आज दिवसभरापासून वातावरण निरभ्र असले, तरी थंडी जाणवत आहे. आजही रात्रीचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पारा 10 पर्यंत खाली आल्यास कोल्हापूरच्या आजवरच्या थंडीच्या तापमानाचा विक्रम मोडित निघण्याची शक्यता आहे.
डिसेंबरच्या उत्तरार्धातही तापमानात घट
यापूर्वी, कोल्हापूर डिसेंबरच्या उत्तरार्धात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात थंडी जाणवली होती. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. कधी परतीचा पाऊस, कधी उन्हाळ्याप्रमाणे चटके, तर कधी ढगाळ, तर कधी अचानक थंडी असे प्रकार सातत्याने होत आहेत. थंडी सुरु झाल्यापासून लहान मुलांमध्ये सर्दी आणि खोकला जाणवू लागला आहे. त्यामुळे दवाखान्यांमध्ये लहान मुलांची गर्दी जाणवू लागली आहे.
तापमानात आणखी घट होण्याची शक्यता
दुसरीकडे, महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.
देशातील अनेक भागातही तापमानात चांगलीच घट झाली आहे त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. सफदरगंजमध्ये 1.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे.
इतर महत्वाच्या बातम्या