बिद्री कारखाना आमची मातृसंस्था म्हणून थांबलो, अन्यथा के.पी.पाटलांनी फौजदारी गुन्हा दाखल होईल इतक्या चुका केल्यात: प्रकाश आबिटकर
Maharashtra Politics: अजित पवार गटाचे नेते के.पी. पाटील विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआसोबत येण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यापूर्वी बिद्री साखर कारखान्यावर धाड पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक सभासद असणारा सहकार साखर कारखाना
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या गोटात दाखल होण्याची तयारी करणारे अजितदादा गटाचे नेते के.पी. पाटील सध्या अडचणीत सापडले आहेत. कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर (bidri sugar factory) राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाकडून नुकतीच धाड टाकण्यात आली होती. या सगळ्यामागे राजकीय गणिते असल्याची चर्चा त्यानंतर सुरु झाली होती. मात्र, शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. के.पी. पाटील (K.P. Patil) यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, इतक्या चुका केल्या आहेत. पण बिद्री साखर कारखाना आमच्यासाठी मातृसंस्था असल्याने आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही. के.पी. पाटील यांच्याविरोधात तक्रारी करायच्या असत्या तर तेव्हाच करता आल्या असत्या. पण आता बिद्री साखर कारखान्यावर पडलेल्या धाडीशी आमचा संबंध नाही, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी प्रकाश आबिटकर यांनी के.पी. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. श्री दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री साखर कारखाना हा काही तुमच्या मालकीचा नाही, तो सभासदांचा आहे. मी बिद्री साखर कारखान्याच्या कामगाराचा मुलगा आहे. राजकारण वेगळं आणि सहकारी संस्था वेगळ्या असतात. बिद्री कारखाना ही आमची मातृसंस्था आहे, आमचं भावनिक नातं या कारखान्याशी जोडलं आहे. त्यामुळे अशा चुका करायला आम्हाला वेळ नाही, मतदारसंघातील काम करणे हे आमचे ध्येय आहे. कोणता छापा पडला हे देखील आम्हाला माहिती नाही, तुमच्यावर छापा टाकायला आम्हाला वेळ नाही, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले.
के.पी. पाटलांनी सर्व फायदे घेतले, खरी भूमिका स्पष्ट करावी: प्रकाश आबिटकर
संस्थेत चांगलं काम करा, संस्थेच्या हितासाठी तुमच्यापुढे दहा पावलं येऊ. बिद्री हा तुमच्या मालकीचा नाही, सभासदांचा आहे कारखान्याचे हित जपणं हे गरजेचे आहे. बिद्री साखर कारखान्याचा आधार घेऊन ते विधानसभा लढवायला निघालेत. 50 खोके, गद्दार, कलंकित आमदाराला पराभूत करूया म्हणून त्यांनी सभा घेतल्या. पण एका वर्षातच ते अजितदादांच्या माध्यमातून सत्तेमध्ये सहभागी झाले. सत्तेत राहून सगळे फायदे घेतले. आता के पी पाटील हे प्रभाकर पणशीकर यांच्या 'तो मी नव्हेच' मधील लखोबा लोखंडेची भूमिका बजावत आहेत. आम्हाला गद्दार म्हणणारे तेच, सत्तेत सहभागी होणार तेच, संजय मंडलिक यांच्या प्रचारात काम करणारे तेच आणि आता शाहू महाराज यांचा सत्कार करणारे तेच. त्यामुळे के.पी. पाटील यांनी आपली खरी भूमिका सांगावी, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले.
शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्यावर के.पी. पाटलांना सर्वाधिक दु:ख झाले; प्रकाश आबिटकरांचा आरोप
आपण काम न करता, काम करणाऱ्यांना नाव ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते सध्या करत आहेत, हे जनता ओळखून आहे. जे चांगलं असेल ते या मतदार संघात असावं यासाठी माझा प्रयत्न आहे. शक्तीपीठ महामार्ग आणण्यापाठी विकास व्हावा हा एकमेव उद्देश होता. रस्ते झाले की विकास होतो हे सत्य आहे. विकास करायचा आहे मात्र लोकांना विश्वासात घेऊन, महामार्गाच्या मंजुरीनंतर अनेक शेतकरी मला भेटायला आले. जनतेची भूमिका पाहिल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना संजय मंडलिक यांच्या माध्यमातून निवेदन देऊन हा महामार्ग थांबवा, अशी विनंती केली.
शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, हे पत्र दिल्यानंतर सगळ्यात जास्त दुःख के पी पाटील साहेबांना झाले. के पी पाटील यांच्या कामाची, राजकारणाची पद्धत विश्वासघातकी आहे. मी के पी पाटील साहेबांच्याबरोबर काम करत होतो, पण ते मागे का राहिलेत? त्यांच्यानंतर मला दहा वर्ष नागरिकांनी निवडून दिलं आहे. कामाची, जबाबदारीची, विश्वासाची भूमिका घेतो म्हणून जनतेने मला निवडून दिले. के पी पाटील विधानसभा लढू देत त्यांना माझ्या शुभेच्छा. पण लोकांमध्ये चुकीचे पसरवून निवडणूक जिंकण्याची केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्याची वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगणे गरजेचे आहे. मतदारसंघातील लखोबा लोखंडेला जनता नक्की ओळखेल, त्यांना माझ्या शुभेच्छा, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले.
आणखी वाचा