(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bidri Sakhar Karkhana : बिद्री साखर कारखान्यासाठी सत्ताधारी गटाकडून पॅनेल जाहीर होताना विरोधी गटाच्या आमदार प्रकाश आबिटकरांच्या नावाच्या घोषणा!
Bidri Sakhar Karkhana : ए. वाय. पाटील बाहेर पडल्याने सत्ताधारी के. पी. पाटील गटाला धक्का बसला असतानाच सत्ताधारी गटाकडून पॅनेल जाहीर होत असतानाच राधानगरी तालुक्यातील नरतवडेमधील सभासदांनी गोंधळ घातला.
कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याची (Bidri Sakhar Karkhana) निवडणूक दिवसागणिक चुरशीची होत चालली आहे. ए. वाय. पाटील बाहेर पडल्याने सत्ताधारी के. पी. पाटील गटाला धक्का बसला असतानाच आज सत्ताधारी आघाडीला नाराजीचा फटका बसला आहे. सत्ताधारी गटाकडून पॅनेल जाहीर होत असतानाच राधानगरी तालुक्यातील नरतवडेमधील सभासदांनी गोंधळ घातला.
सभासदांनी उमेदवारी जाहीर करताना नाव डावलल्याने गोंधळ घातला. यावेळी फत्तेसिंह पाटील यांचे नाव डावलल्याचा आरोप करण्यात आला. नाव डावलण्यात आल्याने निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सभासदांनी प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांचा विजय असो म्हणत काढता पाय घेतला. विशेष म्हणजे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासमोर हा गोंधळ झाला.
मेव्हण्या पावण्यातील संघर्ष टोकाला
दरम्यान, सत्ताधारी गटाचे माजी आमदार के. पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए .वाय. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. राधानगरी तालुक्यातील संचालक मंडळाच्या सर्व सहा जागा आणि बिद्रीचे अध्यक्षपदावर तोडगा निघाला नसल्याने जमत नसल्याचे सांगितल्याने मेव्हण्या पाहुण्यांचे बिद्रीच्या निवडणुकीत फिस्कटल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ए. वाय. पाटील यांच्यापाठोपाठ विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे हे विरोधी खासदार संजय मंडलिक व आमदाक प्रकाश आबिटकर यांच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली असून दोन्ही पॅनेलची अधिकृत घोषणा झाल्यानंतर अनेक उलथापालथींची शक्यता वर्तवली जात असतानाच तसच घडलं आहे.
निवडणूकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक चुरशीने होणार याचा अंदाज आधीच वर्तवला जात होता. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात केवळ 28 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले असून अजूनही मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. ही निवडणूक दुरंगी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून मागील दोन दिवसांत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यातूनच स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांवर नाराज असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सत्ताधारी आघाडीला रामराम करत विरोधी आमदार आबिटकर यांच्या पॅनेलला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्तारुढ गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या