(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asha Bhosle : आशा भोसलेंचा दोन अटींसह लग्नाचा प्रस्ताव अन् दादा कोंडके 'बाबां'च्या सल्ल्यासाठी थेट कोल्हापुरात; अशा निराशेचा प्रसंग का आला?
'विच्छा'मधून यशाची शिखरे पादाक्रांत करत असतानाच दादा व्यक्तीगत आयुष्यात खोल गर्तेत होते. हा पाठशिवणीचा खेळ सुरु असताना 1967 चा काळ असावा त्यावेळी आशाताई भोसले पहिल्यांदाच दादांच्या आयुष्यात आल्या.
आशा भोसले : प्रतिभेचं कोंदण लाभलेल्या गायिका आशाताई भोसले (Asha Bhosle) आज (8 सप्टेंबर) नव्वदीत प्रवेश करत आहेत. आशा भोसले यांनी गायनात अनेक भाषांमध्ये मुशाफिरी करताना आपल्या प्रतिभेची छाप सोडली आहे. आपल्या गाण्यांनी वेड लावून सोडलेल्या आशाताई आणि तसेच, सलग नऊ मराठी चित्रपट सिल्वर ज्युबिली हिट देऊन विनोदी चित्रपटात अजरामर झालेले दादा कोंडके सत्तरच्या दशकात दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. दादा कोंडके (Dada Kondke) यांना ज्या 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाने अस्सल विनोदी कलाकाराची ओळख करून दिली, ते नाटक आशाबाईंनी तब्बल 65 वेळा पाहिलं आहे. दादांनी ज्यांना वडिलांच्या स्थानी मानले, त्या भालजी पेंढारकर यांची ओळखही आशाताईंमुळेच झाली होती.
अनिता पाध्ये यांनी शब्दांकन केलेल्या दादा कोंडके यांच्या 'एकटा जीव' या आत्मचरित्रात आशाबाईंसोबत आलेल्या प्रेमसंबंधासंबंधांवर भाष्य केले आहे.
चार वर्षात संसाराची ताटातूट अन् नीलाची एन्ट्री
दादा कोंडके पहिल्यांदा 1964 मध्ये पहिल्यांदा विवाहबद्ध झाले होते. मनात नसताना केवळ घरच्यांनी तगादा लावल्याने दादा कोंडके विवाहासाठी तयार झाले होते. त्यामुळे त्यांचा नलिनीशी विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर राहण्याची अडचण असल्याने नलिनी गावाकडेच राहत होती, तर दादा मुंबईत नशीब आजमावत होते. 1965 नंतर दादा कोंडके यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण घेताना विच्छा माझी पुरी करा नाटकाने रंगमंचावर धमाल करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी मुंबईत एक खोली घेत पत्नी नलिनीला मुंबईत आणले होते. मात्र, त्यांचा संसार चार वर्षात तुटला. 40 हजारांची पोटगी देत त्यांनी 1968 मध्ये नलिनीला घटस्फोट दिला.
संसार तुटल्यानंतर दादा कोंडके यांचा 'विच्छा'मध्ये नाचकाम करणाऱ्या नीलाच्या संपर्कात आल्यानंतर चांगलेच गुंतले होते. तो गुंता इतका वाढला होता की, ते लग्न न करताच पती पत्नी पद्धतीने राहत होते. मात्र, असे असूनही नीलाच्या विक्षिप्त स्वभावाने दादा कंटाळून गेले होते. दादांच्या कुटुंबीयांना सुद्धा नीलाचा विरोध होऊ लागल्याने त्यामध्ये आणखी भर पडली. दादांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात पाहण्यासाठी नीला फिरकली नव्हती. त्यामुळे कालांतराने ते नीलापासून वेगळे झाले ते कायमचेच.
आशाताईंची एंट्री
'विच्छा'मधून यशाची शिखरे पादाक्रांत करत असतानाच दादा कोंडके व्यक्तीगत आयुष्यात खोल गर्तेत होते. हा पाठशिवणीचा खेळ सुरु असताना 1967 चा काळ असावा त्यावेळी आशाताई भोसले पहिल्यांदाच दादांच्या आयुष्यात आल्या. त्यावेळी विच्छाच्या प्रयोगामध्ये दादा अत्यंत व्यग्र होते. आशाताई विच्छामुळेच दादांच्या सहवासात आल्या होत्या म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे प्रयोग नसल्यास आशाताईंकडून दादांना भटकंतीसाठी घेऊन जात होत्या. त्यावेळी आशाबाईंचा हाॅटेल तसेच शाॅपिंग मोठा शौक होता. त्यामुळे दादांची हाॅटेलबाजी त्यावेळी चांगलीच वाढत गेली. दादांना जेव्हा जेव्हा वेळ असायचा त्यावेळी आशाताई त्यांना हमखाक रेकाॅर्डिंगला नेत असत. इतकेच नव्हे, तर मातब्बरांशी सुद्धा ओळख करून देत होत्या.
आशाताईंकडून लग्नाचा प्रस्ताव
आशाबाई पहिल्या विवाहापासून वेगळ्या झाल्या होत्या आणि मुलंसुद्धा होती. आशाताई आणि दादांच्या संबंधांविषयी लतादीदी यांनाही माहिती होती. आशाताई ज्या पद्धतीने दादांचा वाढदिवस दणकून साजरा करायच्या त्या पद्धतीने विच्छा माझी पुरी करामधील कलाकारांवरही भरभरून कौतुक करत असतं. त्यांनी एकवेळा सोन्याच्या अंगठ्याही दिल्या होत्या. काहीवेळा शो रद्द करण्यासाठी आशाताई हट्ट करत असत, मात्र दादांनी त्याला कधीच होकार दिला नाही.
आशाताई यांनी दादा कोंडके यांना लग्नाचा प्रस्ताव ठेवताना दोन अटी घातल्याने चांगलेच संकटात सापडले होते. आशाबाई यांनी लग्नानंतर कोंडके आडनाव वापरणार नाही आणि लग्नानंतर त्यांच्या फ्लॅटवर राहण्याची अट घातली होती. त्यामुळे दादांना गुरुस्थांनी मानलेल्या आणि बाबा म्हणत असलेल्या भालजी पेंढारकर यांचे मत जाणून घेण्यासाठी कोल्हापूर गाठले होते. आशाताईंनी ज्या पद्धतीने लग्नाचा प्रस्ताव दिला होता. त्याच पद्धतीने बाबांना म्हणजेच, भालजींना सुद्धा माहिती दिली होती. त्यामुळे बाबांनी दादांना एकट्याला विश्वासात घेत अजिबात या लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्हाला कार्यक्रम आहेत. त्यांना मुलबाळं आहेत. त्यांच्या घरी तुम्हाला गड्याचं काम करावं लागेल. बाबांचा सल्ला दादांनी शिरोधार्य मानताना लग्नाला नम्रपणे नकार दिला. मात्र, दोघांमधील व्यावसायिक संबंध कायम राहिले. कालातरांने दादा कोंडके यांच्या घरी जाण्याचे बंद केले. त्यानंतर आशाबाई संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. अर्थात हे लग्न करू नये, असा सल्ला दादांनी त्यांना दिला होता. मात्र, त्यांनी तो ऐकणार नाही म्हणत विवाह केला.
(अनिता पाध्ये यांनी शब्दांकन केलेल्या दादा कोंडके यांच्या 'एकटा जीव' या आत्मचरित्रात आशाबाईंसोबत आलेल्या प्रेमसंबंधासंबंधांवर भाष्य केले आहे.)