Kolhapur Loksabha : लोकसभेसाठी फिल्डिंग; नरके पिता-पुत्र शरद पवारांच्या भेटीला, उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडीकडून लढण्याची तयारी
‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके व त्यांचे पुत्र चेतन नरके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. चेतन नरके आगामी लोकसभेची निवडणूक कोल्हापूर मतदारसंघातून लढवतील, अशी घोषणा अरुण नरके यांनी केली होती.
Kolhapur Loksabha : लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिल्यास लढण्याची तयारी चेतन नरके (Chetan Narke) यांनी यावेळी दर्शवली आहे. करवीरचे अधिपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके व त्यांचे पुत्र विद्यमान संचालक चेतन नरके यांनी भेट घेतली. चेतन नरके आगामी लोकसभेची निवडणूक कोल्हापूर मतदारसंघातून लढवतील, अशी घोषणा स्वतः अरुण नरके यांनी केली होती.
अरुण नरके यांनी घोषणा करताना महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यास विचार करू, असेही म्हटले होते. शरद पवारांशी झालेल्या भेटीदरम्यान उद्योजक व्ही. बी. पाटील, आमदार सतेज पाटील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही शिवसेनेला खिंडार पडले आहे. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे लोकसभेचं चित्र बदलून गेलं आहे.
भाजपकडून या दोन्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात हे दोन्ही खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार की? शिंदे गटाच्या चिन्हावर यावर अजूनही संदिग्धता आहे. सद्यस्थितीत संजय मंडलिक (Kolhapur LokSabha) भाजपच्या चिन्हावर लढतील असेच बोलले जात आहे. दुसरीकडे हातकणंगलेत (Hatkanangale LokSabha) स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकला चलोरे भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत अटळ मानली जात आहे. या मतदारसंघात धैर्यशील माने यांच्याविरोधात राजू शेट्टी आणि ठाकरे गटाकडून कोण असणार? याचीही उत्सुकता आहे.
वंचित बहुजन आघाडीचे (VBA) 2019 मधील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत अस्लम मंगळवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविताना त्यांनी जोरदार टक्कर देत सव्वा लाखांवर मते मिळवली होती. त्यानंतर हाजी अस्लम चर्चेत आले होते.
हाजी अस्लम यांना 2019 मते मिळालेली मते राजकीय भूवया उंचावणारी होती. वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच रिंगणात असताना त्यांना मिळालेल्या मतांनी सर्वाधिक फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना बसला होता. खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात अस्लम सय्यद यांना मिळालेल्या मतांचाही मोठा वाटा होता.
अशा परिस्थितीत सव्वा लाख मते मिळवलेल्या हाजी अस्लम यांच्या शिवसेना प्रवेशाने हातकणंगलेत शिवसेनेला लाभ होईल, अशी आशा आहे. धैर्यशील माने यांच्याविरोधात स्वतंत्रपणे राजू शेट्टी असतील. त्यांनी कोणाचाही पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आजघडीला, तरी घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेकडूनही दोन्ही जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यास राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यासमोर अडचण वाढण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या