Kolhapur : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लांबणीवर; नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांना मतदान आणि निवडणुकीचा अधिकार मिळणार
कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची (Kolhapur Agricultural Produce Market Committee) निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे.
Kolhapur Agricultural Produce Market Committee : गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची (Kolhapur Agricultural Produce Market Committee) निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे. यापूर्वी बाजार समितीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र, आता नियोजित वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्यास 8 दिवसांचा कालावधी बाकी असतानाच ही निवडणूक 15 मार्चपर्यंत स्थगित करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. उच्च न्यायालयाने (Kolhapur Agricultural Produce Market Committee ) आज दिलेल्या आदेशाने किमान चार महिने निवडणूक लांबणीवर पडली आहे. मात्र, न्यायालयाने दिलेल्या आदेशाने बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामधील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना बाजार समितीसाठी मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळणार आहे.
दरम्यान, अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर बाजार समिती निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते, तर 29 जानेवारी रोजी मतदान होणार होते. तथापि, जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु असल्याने नवनिर्वाचित सदस्य बाजार समितीमध्ये मतदानापासून वंचित राहणार होते. त्यामुळे बाजार समिती निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत गटातील यादी नव्याने तयार करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया 15 मार्चपर्यंत स्थगित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशाने ग्रामपंचायत गट वगळून इतर गटातील मतदारयादी पूर्वीचीच राहिल. मात्र, ग्रामपंचायत गटातील यादी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या समावेशाच्या नव्याने प्रसिद्ध होईल.
इतर महत्वाच्या बातम्या