(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रथमच हातकणंगलेत बैलगाडी शर्यतीचा थरार
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाच्या माळावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना एकूण सव्वा लाखांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
Kolhapur News: राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने दूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा शर्यतीचा रंगणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात 22 मे रोजी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाच्या माळावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना एकूण सव्वा लाखांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. सकाळी नऊ वाजता स्पर्धा होईल. खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शर्यतीला सुरुवात होणार आहे.
बैलगाडी शर्यत विजेत्याला 31 हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी 21 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी 11 हजार रुपये बक्षीस आहे. जनरल बैलगाडी अ गट, जनरल बैलगाडी ब गट, बैलगाडी जनरल गट आणि दुसा व चौसा जनरल गाडी गट अशा प्रकारात शर्यती होतील. बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत सुप्रीम कोर्टात घटनापीठाने सुनावणीनंतर याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने महाराष्ट्राचा कायदा वैध ठरवताना तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा केला आहे. सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे बैलगाडाप्रेमींचं लक्ष लागले होते. अखेर बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी मोठा दिलासा आहे.
महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा राज्य सरकारचा कायदा वैध ठरल्याने बैलगाडा शर्यतीपुढील सर्व अडथळे दूर झाले आहेत. डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने निकालात स्पष्ट म्हटले की, महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत, तामिळनाडूने जल्लीकट्टू, कर्नाटकने कंबालाबाबत जे कायदे केले आहेत ते वैध आहेत. जल्लीकट्टू हा खेळ तामिळनडूच्या संस्कृतीचा भाग आहे. यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. जर प्राण्यांना क्रूर पद्धतीने वागणूक दिली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
इतर महत्वाच्या बातम्या