Aaditya Thakeray on Shiv Sena MLA Disqualification Case : तर 40 गद्दार बाद होतील, पुन्हा निवडून येणार नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
Aaditya Thakeray : सरकार टिकल्यास मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील, असा टोलाही त्यांनी लगावला. संविधानाच्या चौकटीत न्याय झाल्यास तर 40 गद्दार बाद होतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर : प्रश्न फक्त आमचा नसून अवघं जग पाहत आहे, देशामध्ये संविधान टीकणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) नाव खराब करून घेणार नाहीत, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thakeray on Shiv Sena MLA Disqualification Case) यांनी दिली. आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्याव पोहोचले आहेत.
त्यांनी कोल्हापुरात पोहोचल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भेटीवर कडाडून टीका केली. न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेले, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी दोघांच्या भेटीवर हल्लाबोल केला.
सरकार टिकल्यास मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील
आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातला पळवला जात आहे. सगळं गुजरातला पळवणार होता, तर सरकार का मारलं? हे सरकार टिकल्यास मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 गद्दार अपात्र होतील
उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो असे सांगत आदित्य ठाकरे यांनी संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 गद्दार बाद होऊन अपात्र होतील, असा विश्वास व्यक्त केला. या प्रकरणात राहुल नार्वेकर बेअब्रू करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतील याचा फैसला सुद्धा होईल, असेही आदित्य यांनी सांगितले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या दोनदिवसीय दौऱ्यात कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार का? याची चर्चा आहे. राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सडकून टीका केली होती. यानंतर त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांचा दौरा होत असल्याने हा वाद मिटवणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. लोकसभेच्या आडून विधानसभेसाठी काही संकेत मिळणार का? याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोल्हापूर आणि हातकणंगलेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडणार असल्याची चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या