Aaditya Thackeray : हा निर्लज्जपणाचा कळस, आम्ही कायदेशीर लढाई लढणार, राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
Aaditya Thackeray : राहुल नार्वेकरांनी शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना हा निर्णय दिल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
कोल्हापूर : शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला. त्यावर आदित्य ठाकरे (Aaditya Thakceray) यांची प्रतिक्रिया समोर आलीये. नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करायची कारण सर्व काही सेटिंग झालीये, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिलीये. दरम्यान यावेळी आदित्य ठाकरेंचे डोळे देखील पाण्यावल्याचं पाहायला मिळालं. राहुल नार्वेकरांच्या निकालामुळे ठाकरे गटाला बरेच मोठे धक्के बसले असून शिंदेंचं आमदार अपात्र नसल्याचंही यावेळी राहुल नार्वेकरांनी म्हटलं.
विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात शिवसेना हा पक्ष कोणाचा, यावर निर्णय दिला. यामध्ये पक्षाची घटना, नेतृत्वाची रचना आणि विधिमंडळ पक्ष याचा विचार करण्यात आला. निवडणूक आयोगात असलेली शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरण्यात आली. शिवसेनेच्या घटनेतील बदल हे निवडणूक आयोगातील घटनेत आढळले नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. 2018 मध्ये पक्ष घटनेत झालेले बदल निवडणूक आयोगाकडे नसल्याचेही विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदेंची असल्याचा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला.
हा निर्लज्जपणाचा कळस - आदित्य ठाकरे
मूळ राजकीय पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे.विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली तर, खोक्यांचा राजकारण झालं तर असंच त्यांना वाचवलं जाणार. भाजपाला आपलं संविधान बदलायचंय. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान घ्यायचा आहे ते स्पष्ट झालं. नेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित करत राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आजारी असताना यांनी गद्दारी केली - आदित्य ठाकरे
आम्ही कायदेशीर लढाई लढणार - आदित्य ठाकरे
लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेत. जगाला आता कळलेला आहे की आपल्या देशात लोकशाहीला मारलेला आहे आणि देशात हिटलर शाही सुरू झालेले आहे.जगाला आता कळलेला आहे की आपल्या देशात लोकशाहीला मारलेला आहे आणि देशात हिटलर शाही सुरू झालेले आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढली जाईल, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी, तुरुगांत जाण्यापासून वाचवण्यासाठी गद्दारांच्या टोळीच्या प्रमुखाने हे सगळं केलं. उद्धव ठाकरे आजारी असताना यांनी गद्दारी केली. उद्धव ठाकरे यांनी स्वतःची काळजी घेतली नाही या जनतेची काळजी घेतली. काय दिलं नव्हतं म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मंत्रीपद दिलं, ओळख दिली त्यांनाच फसवलं.किती काळं मन असेल या माणसाचं. ज्या माणसाला बेडवरून उठता येत नाही त्यावेळी गद्दारी केली.गोव्यात जाऊन कसे नाचले बघितला का? असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
मंत्री होण्याची क्षमता नाही पण मुख्यमंत्री झालेत - आदित्य ठाकरे
राज्यात जी सर्कस सुरु आहे ती थांबली पाहिजे. एक मंत्री बनायची क्षमता पण बनलेत मुख्यमंत्री. न्याय आम्ही शिवसेनेसाठी मागत नाही तर राज्यासाठी आणि देशासाठी मागतोय. महाराष्ट्र देखील देशातच आहे देशाच्या बाहेर नाही. आमच्या राज्यावर अन्याय का केला जातोय. असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.