Kolhapur News: आजीची नजर चुकवून गेला आणि नियतीने डाव साधला; मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू
आदित्य शिवाजी पाटील या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वेतवडीमध्ये घडली. तो पोहण्यासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली.

Kolhapur News: मामाच्या गावी उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या अवघ्या 13 वर्षीय आदित्य शिवाजी पाटील या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वेतवडीमध्ये घडली. तो पोहण्यासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. आदित्य मूळचा गगनबावडा तालुक्यातील खेरीवडे असला, तरी तो सध्या पुण्यात राहत होता.
आदित्य वेतवडेमध्ये मामाकडे उन्हाळी सुट्टीसाठी महिनाभर राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास वेतवडे येथील धामणी नदीत आंघोळीसाठी गेला होता. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तसेच पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने सर्वत्र त्याची शोधाशोध सुरू करण्यात आली. जनावरांना पाण्यासाठी घेऊन गेलेल्या एका व्यक्तीला नदीकाठी चप्पल व कपडे दिसल्याने तो या ठिकाणीच बुडाला असणार याचा अंदाज घेऊन गावातील तरुणांनी पाण्यात शोध सुरु केला. अखेर सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.
दरम्यान मामा युवराज पाटील यांचा आदित्य हा लाडका भाचा होता. तो दरवर्षी सुट्टीला मामाकडे येत होता. त्याच पद्धतीने यंदाही आला होता. शुक्रवारी सकाळी दोघेही नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहून आल्यानंतर मामाने त्याला पुन्हा नदीवर जाऊ नको उद्या तुला गावी जायचं आहे असेही सांगितले होते. मात्र. मामा कामासाठी कोल्हापूरला गेल्यानंतर घरी फक्त आजी आणि आदित्य दोघेच होते. त्यावेळी आजीची नजर चुकवून तो पुन्हा नदीकडे पोहण्यासाठी गेला आणि नियतीने डाव साधायचा तो साधला.
वारणा नदीत दोन सख्ख्या मावस भावांचा बुडून मृत्यू
दुसरीकडे, पोहता येत नसतानाही रणरणत्या उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी वारणा नदीत उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (27 मे) सकाळी सांगलीतील तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे उघडकीस आली होती. शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह मालेवाडी जॅकवेलच्या ठिकाणी सापडले होते अमोल प्रकाश सुतार (वय 16) व रविराज उत्तम सुतार (वय 12) ही नात्याने मावस भाऊ असलेली दोन शाळकरी मुलं वैरण काढण्यासाठी शुक्रवारी दुपारी वारणाकाठी असलेल्या शेतात गेली होती. सायंकाळपर्यंत मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी शोध सुरु होता, पण सापडले नव्हते. शनिवारी सकाळी पुन्हा मुलांचा शोध बचाव पथकामार्फत सुरू करण्यात आला. यावेळी बचाव पथकाला मालेवाडी जॅकवेलनजीक दोन्ही मुलांचे मृतदेह आढळले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
