Karuna Sharma on Walmik Karad: वाल्मिक कराडने माझ्या अंगाला गैरस्पर्श केला अन्...; करुणा शर्माचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?
Karuna Sharma on Walmik Karad: करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराडवर काही खळबळजनक आरोप केले आहेत.

Karuna Sharma on Walmik Karad: करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचे निरीक्षण नोंदवत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना करुणा यांना दरमहा 1 लाख 25 हजार रुपये, तर त्यांच्या मुलीसाठी 75 हजार रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश दिले. तर मुलाचे वय 21 वर्षे असल्याने त्याच्यासाठी देखभालीचा खर्च देण्यास न्यायालयाने नकार दिला. काल (7 फेब्रुवारी) वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने याबाबत निर्देश दिले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर करुण शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्याप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्याबाबत देखील धक्कादायक खुलासा केला आहे.
बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराडने माझ्यावर हात उगारला होता. तसेच वाल्मिक कराडने अंगाला गैरस्पर्श करत मारहाण केली होती. माझ्या पतीसमोर वाल्मिक कराडने माझ्यावर हात उगारला. मी यावेळीचा सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी मागणी केली होती. मात्र मला ते अजूनही मिळालेले नाही, असा धक्कादायक आरोपही करुण शर्मा यांनी केला. तसेच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी देखील करुणा शर्मा यांनी केली आहे.
मुलगा धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ धावून आला-
करूणा मुंडे या धनंजय मुंडेंवर आगपाखड करत असल्या तरी त्यांचा मुलगा मात्र धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ धावून आलाय. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर लावलेले बरेचसे आरोप सिशिव मुंडेनं खोडून काढलेत.. उलट करुणा मुंडेंकडूनच छळ केला जातो असा सीशिवच्या पोस्टमध्ये दावा करण्यात आलाय. आईला म्हणजे करूणा यांना कोणतीही आर्थिक अडचण नसल्याचंही पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय. तसंच ती काही ना काही बहाणे बनवते असंही शीशिवच्या स्टेटसवर ठेवण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान धनंजय मुंडेंच्या दबावामुळे सिशिव ने ही पोस्ट केल्याचा पलटवार करुणा मुंडेंनी केलाय.
कोण आहेत करुणा शर्मा?
करुणा शर्मा यांच्याबद्दल सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीनुसार, त्या मूळच्या मध्यप्रदेशातील इंदूरच्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून कामाच्या निमित्ताने मुंबईत रहात असल्याची माहिती आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की त्या मुंबईतील 'जीवनज्योत' या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित आहेत. काही ठिकाणी त्यांनी सामाजिक कामांची माहिती दिली आहे. करुणा शर्मा फेसबुक अकाऊंटवर त्यांचं नाव 'करुणा धनंजय मुंडे' असं लिहिण्यात आलं आहे. धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द बीडमधील परळीतून सुरू झाली. धनंजय मुंडेंचं राजकारण जवळून पहाणारे बीडमधील पत्रकार उद्धव मोरे सांगतात, "करुणा शर्मा यांचं नाव परळीत धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच फारसं माहीत नव्हतं. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेंनी स्वत:च करुणा शर्मांबाबत नात्याचा खुलासा केला. तेव्हा परळी आणि बीडमधील लोकांना करुणा शर्मा हे नाव माहीत झालं." परळीतील धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय करूणा शर्मा आणि धनंजय मुंडें यांच्या नात्याबद्दल काहीच सांगण्यास तयार नाहीत. नाव न घेण्याच्या अटीवर एका निकटवर्तीयाने सांगितलं की, "राजकारणात सक्रिय नसल्यापासून धनंजय मुंडेंची करुणा शर्मांसोबत ओळख होती." उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी मिळाली. धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला करूणा शर्मा आणि त्यांची दोन मुलं उपस्थित असल्याचा फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.काही काळानंतर धनंयज मुंडे आणि करुणा शर्मा यांचे काही खासगी फोटोही व्हॉट्सअपवर व्हायरल झाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद केला होता.
























