(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे भावूक, भर पत्रकार परिषेदत ढसाढसा रडले; म्हणाले आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही...
Manoj Jarange : आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही असे मनोज जरांगे म्हणाले. पण याचवेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईला (Mumbai) निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) पत्रकार परिषद बोलावली होती. दरम्यान, यावेळी बोलतांना मनोज जरांगे (Manoj Jarange) भावूक झाले आणि भर पत्रकार परिषेदत ढसाढसा रडले. मनोज जरांगे भावूक झाल्याचे पाहून उपस्थित आंदोलकांचा देखील कंठ दाटून आले. तर, आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे काही वेळात मुंबईकडे निघणार आहेत. यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलतांना जरांगे भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यार्त अश्रू आले. स्वतःला सावरत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, आमरण उपोषण आणि मुंबईकडे जाण्याची घोषणा करून एक महिना झाला तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. एवढा निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजेच अन्यायाचा कळस झाला. त्यामुळे शेवटी आता मराठ्यांनाच शांततेच अस्त्र हातात घेऊन, यांचं कायमचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही. कारण आपल्याच मुलांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं असेल, आपले मुलं मोठे झाले नको पाहिजे असे यांनी ठरवले असेल, त्यामुळे यांचं राजकीय आयुष्य कायमचं सुपडासाप केल्याशिवाय चालणार नाही, असे जरांगे म्हणाले. यावेळी बोलताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडले.
मुंबईकडे निघण्यासाठी आंदोलक तयार...
आंतरवाली सराटीमध्ये मुंबई आंदोलनासाठी लगबग पाहायला मिळत असून, आंदोलकांमध्ये मोठा उत्साह आहे. पुढच्या काही वेळात मनोज जरांगे आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेला रवाना होतील. मात्र, यापूर्वी गावात आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मराठवाड्यासह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक रात्रीपासूनच आंतरवालीत दाखल होतांना पाहायला मिळत आहे. तर, यावेळी आंदोलकांच्या चहा, नाष्ट्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
मुंबई आंदोलनाची दिशा यापूर्वीच जरांगे यांनी जाहीर केली आहे. मुंबईला जातांना कसा मार्ग असणार, कुठे मुक्काम असणार याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्याचं नियोजन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आंतरवाली सराटीपासूनच पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच, आंदोलनात सीआयडी, एसआयडी, आयबीचे अधिकारी देखील सहभागी असणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
मुंबईला निघण्यापूर्वी जरांगेंनी शेवटचा डाव टाकला, सरकारची अडचण वाढणार; मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार