Jalna: पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्याचा आरोप करत समर्थकांकडून आत्मक्लेश आंदोलन
पंकजा मुंडे याचं पुर्नवसन न केल्यास भाजपला कायमचा तोबा करू असा इशाराही आंदोलकांनी दिला
Jalna News: माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजप पक्षाकडून जाणीवपूर्वक डावलले जात असून, याचाच निषेध म्हणून जालन्यात त्यांच्या समर्थकांकडून काळया फिती लावून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. जालन्यातील गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची मागणी सुद्धा आंदोलकांनी केली. अन्यथा भाजपला कायमचा तोबा करू असा इशाराही आंदोलकांनी दिला.
भाजपकडून नुकतेच विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी आहे. जालना जिल्ह्यातील पंकजा यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा मोठा संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज जालन्यातील गांधी चौकात पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले डॉ श्रीमंत मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. 40 वर्षांपासून भाजपला मतदान करून खुप मोठी घोडचूक केल्याची भावना व्यक्त करण्यासाठी आणि चाळीस वर्षांच्या चुकीबद्दल हे आत्मक्लेश आंदोलन असल्याचं मिसाळ म्हणाले.
आता शांत बसून जमणार नाही...
यावेळी बोलताना मिसाळ म्हणाले की, काल परवा बाहेरून आयात केलेल्या लोकांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाता आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून निष्ठावंत आणि जनाधार असलेल्या नेतृत्वाला जनसंपर्कापासून व महत्वाच्या पदापासून दुर ठेवून कण-कण करून संपवले जात आहे. परंतु आता सहनशीलतेचा अंत झाला आहे. आता शांत बसून जमणार नाही. ज्यांना आपण मोठं केलं तेच जर आपल्याला संपवणार असतील तर त्यांच्या मुळावरही घालण्याची वेळ आली असल्याचं मिसाळ म्हणाले. त्यामुळे यापुढे पंकजा मुंडे यांचे पुर्नवसन न केल्यास भाजपला कायमचा तोबा करणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.
पंकजांची काळजी करायला भाजप समर्थ
तर पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात येत असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंकजा मुंडे यांची काळजी करायला भारतीय जनता पार्टी समर्थ आहे. पंकजा ताई मोदीजिंपासून अमित शहा यांच्यापासून आणि देवेंद्र जी पासून सगळ्यांच्या घरातील मुलगी आहे. त्यामुळे तिची काळजी करण्याची वेळ आली नसून,आम्ही समर्थ आहोत.