ATS Raids: एटीएस पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; PFI च्या आणखी एका सदस्याला जालन्यातून अटक
Jalna: शेख उमरला न्यायालयाने 15 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, तपासातून आणखी काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ATS Raids In Jalna: ईस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटने विरोधात देशविरोधी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत देशातील वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. औरंगाबाद आणि जालनासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एटीएसने अशीच कारवाई केली होती. दरम्यान एटीएसकडून (ATS) जालन्यातील आणखी एका पीएफआय ( PFI) सदस्याला अटक करण्यात आली आहे. शेख अमर शेख हबीब (वय 30 रा.पीर सावंगी तालुका बदनापूर, ह. मु. आरेफ कॉलनी गांधीनगर, जालना) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, 15 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बेकायदेशीर कृत्य केल्याच्या अनुषंगाने राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) कारवाई करत औरंगाबाद,जालना, नांदेड, परभणी जिल्ह्यातून यापूर्वी अनेक पीएफआयच्या सदस्यांना अटक केली होती. यातील औरंगाबाद येथील शेख नासेर शेख साबेर यालाही अटक करण्यात आली होती. 'पीएफआय'चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या नासेरच्या सांगण्यावरून इतर चौघांनी वेगवेगळ्या मिशनवर काम केले होते. दरम्यान यातील फैजलने जालना आणि बीड जिल्ह्यात शारीरिक प्रशिक्षण दिल्याचे तपासात समोर आले होते. त्याच तपासाच्या अनुषंगाने एटीएसने आता जालन्यातून आणखी एकाला अटक केली आहे. शेख उमरला न्यायालयाने 15 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, तपासातून आणखी काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एटीएसने यापूर्वी जालना येथून अब्दुल हदी नावाच्या पीएफआयच्या सदस्याला अटक केली होती.तर सोमवारी अटक करण्यात आलेला शेख उमर हा अब्दुल हदीच्या संपर्कात असल्याचे तपासास समोर आले. अटक करण्यात आलेल्या शेख उमरला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी 'टेरर फंडिंग', मोबाईलची तपासणी आणि बँक स्टेटमेंट चौकशीसाठी पोलीस कोठडीची एटीएसकडून मागणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने 15 ऑक्टोंबरपर्यंत शेख उमरला पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Ban On PFI: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून पीएफआयवर पाच वर्षांची बंदी
मोठी बातमी! पीएफआयच्या रडारवर होते वरिष्ठ पोलीस अधिकारी, न्यायाधीश; एटीएसचा न्यायालयात मोठा खुलासा