(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna News: जालन्यात 87 वर्षीय वृद्धेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ; वन्यप्राण्याचा हल्ला की घातपात?
Jalna Crime News: वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी वन्य प्राण्याच्या पायाचे ठसे दिसले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Jalna News: जालन्यातील भोकरदन तालुक्यातील चोन्हाळा शिवारात एका 87 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वन्यप्राण्याने हल्ला केल्यामुळे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी वन्य प्राण्याच्या पायाचे ठसे दिसले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लंकाबाई राऊत (वय 87 वर्षे, चोन्हाळा ता.भोकरदन, जालना) असे या मृत वृद्ध महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लंकाबाई सुखलाल राऊत यांना दोन मुले आहेत. मदनलाल राऊत या मुलासह बाभूळगाव लगत असलेल्या चोन्हाळा शिवारातील शेतात त्या राहत होत्या. शुक्रवारी त्यांचा मुलगा काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने लंकाबाई घरी एकट्याच होत्या. मुलगा शनिवारी पहाटे घरी आल्यानंतर त्याला आई घरात दिसली नाही. त्यामुळे त्याने आजूबाजूला शोध घेतला. काही अंतरावर लंकाबाई या मृत अवस्थेत आढळून आल्या. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस अधिकारी रत्नदीप जोगदंड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा पोलिसांना संशय
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, यावेळी लंकाबाई यांचा मृतदेह घरापासून काही अंतरावर दिसला. तसेच त्यांचा गळा फाडल्याचे दिसले. त्यामुळे हा हिंस्र प्राण्याचा हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर लंकाबाई यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. तर घडलेल्या घटनेबाबत वन विभागाला देखील माहिती देण्यात आली होती.
घटनास्थळी वन्यप्राण्यांचे ठसे नाहीच
दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी वन्यप्राण्यांचे ठसे दिसले नाहीत. शरीरावर इतर ठिकाणी काही ओरखडे नाहीत. केवळ गळ्यावर खोल जखम आहे. डोक्यावर केस नाही, त्यामुळे हा वन्यप्राण्याचा हल्ला आहे की नाही आताच सांगता येणार नसल्याच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता अहवाल आल्यावरच लंकाबाईचा मृत्यू कशामुळे झाला कळणार आहे.
परिसरात खळबळ!
लंकाबाई या चोन्हाळा शिवारातील शेतात आपल्या मुलासोबत राहत होत्या. दरम्यान त्यांचा मुलगा घरी नसताना लंकाबाई यांचा मृतदेह आढळून आला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर वन्यप्राण्याने हल्ला केल्याच्या चर्चेने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या भागात शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे याचा खुलासा होण्याची गरज असल्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Jalna News: जालन्यातील 'क्रिप्टो' घोटाळ्याची व्याप्ती वाढली, आतापर्यंत 103 तक्रारी दाखल