Arjun Khotkar: भाजपचा 'जल आक्रोश मोर्चा' म्हणजे फुसकाबार; खोतकरांचा खोचक टोला
Jalna News:फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला मोर्चासाठी आणलं पण, मोर्चा फुसकाबार निघाला: खोतकर
Jalna News: जालना शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या विरोधात भाजपकडून आज 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनतर आता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिले आहे. भाजपकडून जालना शहरात काढण्यात आलेला 'जल आक्रोश मोर्चा' म्हणजे फुसकाबार होता, असा खोचक टोला खोतकर यांनी लगावला आहे. तर मोर्च्याला अवघ्या 1500 लोकं उपलब्ध असल्याचा दावा सुद्धा खोतकर यांनी केला आहे.
यावेळी बोलताना खोतकर म्हणाले, भाजपचा मोर्चा म्हणजे फुसकाबार होता. विशेष म्हणजे फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला मोर्चासाठी आणलं पण, मोर्चा फुसकाबार निघाला. हा मोर्चा कुणाच्या विरोधात हे कळलेच नाही. गेली 10 वर्ष सत्तेत असताना काय झाले. मुळात स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि भाजपचा साखरपुडा झाला आणि मधुचंद्र झाला. हा मोर्चा पालिकेविरोधात नव्हता तर अर्जुन खोतकर यांना शिव्या देण्यासाठी काढण्यात आल्याचा आरोपही खोतकर यांनी यावेळी केले.
सत्तारांना औरंगजेब म्हणणे चुकीचे?
सिल्लोडचा औरंगजेब माझ्यावर टीका करण्यासाठी सोडला असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी केली होती. यावर बोलताना खोतकर म्हणाले, सत्तार यांना औरंगजेब म्हणणे चुकीचे असून, मी त्याचा निषेध करतो. तसेच सत्तार यांना औरंगजेब म्हणणे म्हणजे त्यांना निवडून दिलेल्या लोकांचा अपमान असल्याचा सुद्धा खोतकर म्हणाले.
घोडा मैदान जवळ
आम्हाला खिशात ठेवण्याच दानवे म्हणाले, याचा अर्थ त्यांचे खिसे आता मोठे झालेत, ते किती मोठे झालेत हे त्यांच्या जावयाच सांगतील. कोणी काय केले हे समोरा-समोर येउत, आव्हान स्वीकारू, घोडा मैदान जवळ आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ही नौटंकी सुरु आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि भाजप एकच असून, निवडणुकीच्या तोंडावर वेगळं दाखवन गरजेचं असते, असेही खोतकर म्हणाले.
फडणवीसांची टीका...
जालना शहरातील पाणी प्रश्नावरून आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी फडणवीस यानी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकार चाळलं कुठय, मुख्यमंत्री कार चालवतात आणि भगवान सरकार चालवत आहे. जोपर्यंत तुम्ही सामन्या माणसाला न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही,तुम्हाला कारभार चालवू देणार नाही आणि एक-एक दिवस तुमचा भारी करू असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.