(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खबरदार! शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवू नये; कृषी आयुक्तांचे आढावा बैठकीत निर्देश
Jalna News : कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक संपन्न झाली.
Jalna News : जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (7 एप्रिल) कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. ज्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करुन द्यावीत. याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ देऊ नये, याची दक्षता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. कंपन्यांनी देखील बियाणे आणि खत पुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन करुन पारदर्शकता ठेवावी. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवू नये, असे निर्देश चव्हाण यांनी यावेळी दिले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांसह बियाणे आणि खत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच, कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांना व्यवस्थित पावती द्यावी. गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. बोगस बियाणे किंवा खत आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना सहकार्य करावे, अशा सूचना कृषी विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी केल्या.
खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध करुन द्यावीत
- शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवू नये
- बोगस बियाणे-खत आढळल्यास कडक कारवाई करावी
- कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात
- कृषी सेवा केंद्रांनी बियाणे व खतांच्या उपलब्धतेची माहिती बोर्डवर नमूद करावी
- शेतकऱ्यांना चुकीची पावती देऊ नये
- भरारी पथक, टोल फ्री क्रमांक, नियंत्रण कक्ष सक्रीय करावा
- बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बोंडअळीचे व्यवस्थापन याबाबत जनजागृती करावी
- पेरणीबाबत शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करावे
बियाणे-खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करु नये
पुढे बोलताना खरीप हंगामासाठी बियाणे व खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे, असे चव्हाण म्हणाले. तर कृषी अधिकाऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करुन शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे-खते उपलब्ध करुन द्यावीत. गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी बियाणांची काटेकोर तपासणी करावी. सर्व अधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून बीज प्रक्रिया केंद्रांना प्रत्यक्ष भेट दयावी. बीजाचे प्रमाणिकरण करण्यात आले आहे का, प्रक्रिया केंद्र नोंदणीकृत आहेत का, त्यांच्याकडे परवाने आहेत का, याची सखोल तपासणी करावी. कंपन्यांनी बीज प्रमाणीकरण करुनच बाजारात बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करावे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे अमीष दाखवू नये. बाजारात बियाणे-खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करु नये. असे प्रकार आढळल्यास किंवा बोगस बियाणे-खते आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी कडक कार्यवाई करुन गुन्हा दाखल करावा. कृषी सेवा केंद्रांनी दुकानाच्या बाहेर उपलब्ध बियाणे व खतांची माहिती बोर्डवर ठळकपणे नमूद करावी. जेणेकरुन शेतकऱ्यांची धावपळ होणार नाही, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या: