दुष्काळात तेरावा महिना! जायकवाडीतून जालना महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीज पुरवठा खंडित
Jalna District Water shortage : जालना शहरातील पाणीपूरवठा अनिश्चित काळासाठी बंद होणार असून, जालनाकरांना दुष्काळात तेरावा महिना सहन करावा लागु शकतो.
Jalna District Water shortage : एकीकडे जालना जिल्ह्यात पाणी टंचाई (Jalna District Water shortage) पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे जालना महानगरपालिकेचा (Jalna Municipal Corporation) जायकवाडीतील (Jayakwadi) पाणीपुरवठा योजनेचा (Water Supply Scheme) वीज पुरवठा खंडित (Power Supply Disconnect) करण्यात आला आहे. महावितरण विभागाने ही कारवाई केली आहे. जालना महानगरपालिकीकडे चालू महिन्याच्या 54 लाख 77 हजारांच्या बिलासह, एकूण 4 कोटी 7 लक्ष रुपयांच्या थकबाकी आहे. अनेकदा नोटीस देऊन महानगरपालिका कोणतेही दखल घेत नसल्याने महावितरण (Maha Vitaran) विभागाने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे, जालना शहरातील पाणीपूरवठा अनिश्चित काळासाठी बंद होणार असून, जालनाकरांना दुष्काळात तेरावा महिना सहन करावा लागु शकतो.
जालना शहरातील धरण आणि तलावातील पाणी आटल्याने सध्या शहराला जायकवाडी धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी पाणीपुरवठा योजेनला महावितरण वीजपुरवठा करते. मात्र, जालना महानगरपालिकेकडे महावितरणची एकूण 4 कोटी 7 लक्ष रुपयांच्या थकबाकी आहे. महावितरणने या अगोदर 6 मार्च रोजी पत्राद्वारे चालू थकबाकी भरण्यासाठी महापालिकेकडे विनंती केली होती. मात्र, वारंवार सूचना देऊन देखील दुर्लक्ष केल्याने महापालिकेच्या या पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा आज अखेर खंडित करण्यात आला आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे जालना शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
यापूर्वी जानेवारीत विजपुरवठा खंडित केला होता...
महानगरपालिकेकडे जानेवारी महिन्यात महावितरण कंपनीची जवळपास तीन कोटी 98 लाख 46 हजार 880 रूपयांची थकबाकी होती. त्यावेळी महावितरण कंपनीने पाणीपुरवठा योजनेचा विजपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर महानगरपालिकने जानेवारीचे जवळपास 47 लाख 29 हजार 719 रूपयांचे वीजबिल 26 फेब्रुवारी 2024 रोजी भरले होते. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता.
निम्न दूधना धरणात केवळ 7.29 टक्केच जिवंत पाणीसाठा
जालना जिल्ह्यातील परतूर शहरासह परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नगरपालिकेच्या वतीने आठवड्याला केवळ एक दिवस पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दूधना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, या प्रकल्पात आता केवळ 7.29 टक्केच जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
जालना जिल्ह्यात 301 टँकरने पाणीपुरवठा
जालना शहरात आणि ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवत आहे. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात कालपर्यंत 301 टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील 194 गावं आणि 55 वाड्यावर एकूण 301 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहेत. ज्यात 116 खाजगी आणि 1 शासकीय टँकरचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मराठवाड्यात पाणी संकट! पाण्यासाठी रात्र काढावी लागते जागून, नेतेमंडळी मात्र प्रचारात व्यस्थ